मनसे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांचा लातूर इथं मुक्काम आहे. राज ठाकरे लातूरात पोहचताच मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्याचसोबत राज यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. राज ठाकरे आज लातूरमध्ये असून याठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते अनेक सामाजिक संघटनातील लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान आज माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूरमध्ये राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
मराठवाडा वॉटरग्रिड योजना सुरुवात करणे, उजनी धरणातून वाहून जाणारे पाणी ज्याला शासनाची कॅबिनेट मान्यता असून ते सिना कोळेगाव येथून मांजरा धरणात आणावे आदी मराठवाड्याच्या विविध विकासाच्या चर्चा राज ठाकरेंसोबत केल्याचं शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी सांगितले. मात्र कव्हेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राज ठाकरे आज लातूरमध्ये असून याठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते अनेक सामाजिक संघटनातील लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. लातूरमधील शेतकऱ्यांनीही राज ठाकरेंची भेट घेत त्यांच्यासमोर गाऱ्हाणी मांडली. यावेळी माजी आमदार आणि सध्याचे भाजपा किसान मोर्चाचे गोवा, गुजरातचे प्रभारी असलेले शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. शिवाजीराव पाटील कव्हेकर हे लातूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
विशेष म्हणजे शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी १९९५ साली काँग्रेस नेते विलासराव देशमुखांचा पराभव केला होता. तेव्हा ते जनता दलाचे उमेदवार होते. कव्हेकर आणि देशमुख हे कट्टर विरोधक होते. मात्र २००९ मध्ये लातूर मतदारसंघाची फेररचना होत २ मतदारसंघ पडले. त्यात लातूर शहरातून अमित देशमुखांना काँग्रेसनं उमेदवारी दिली. यावेळी विलासरावांनी कव्हेकर यांची घरी जाऊन नाराजी दूर केली. तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र २०१९ मध्ये लातूर ग्रामीणमधून ते निवडणूक लढवू इच्छित होते. मात्र काँग्रेसनं याठिकाणी अमित देशमुखांचे लहान बंधू धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसकडून मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी भाजपात प्रवेश केला.