बांगलादेशमधील सातखीरा जिल्ह्यातील जेशोरेश्वरी मंदिरातील देवी कालीचा सोन्याचा मुकुट चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी हा मुकुट त्यांनी या मंदिराला भेट दिला होता. मात्र, हा मुकुट आता चोरीला गेला आहे. हा मुकुट चांदी आणि सोन्याचा होता. मंदिराचे मुख्य पुजारी हे गुरुवारी सकाळी देवी कालीची पूजा संपल्यानंतर बाहेर निघून गेले. त्यानंतर दुपारी हा मुकुट चोरीला गेल्याची माहिती आहे. ही घटना येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर ही घटना उघडकीस आली.

जेशोरेश्वरी हे मंदिर सातखिऱ्यातील ईश्वरीपूर येथे आहे. बाराव्या शतकात अनारी नावाच्या ब्राह्मणाने हे मंदिर बांधले असे मानले जाते. त्यांनी जशोरेश्वरी पीठासाठी १०० दरवाजांचे मंदिर बांधले. पुढे तेराव्या शतकात लक्ष्मण सेन यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. सोळाव्या शतकात राजा प्रतापादित्य याने या मंदिराची पुनर्बांधणी केली. दुर्गा उत्सवावरून बांगलादेशातील हिंदू समुदायाला धमक्या दिल्या जात असताना ही घटना घडली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी दुपारी जशोरेश्वरी मंदिरातून हा मुकुट चोरीला गेला. घटनेच्या काही वेळापूर्वी मंदिराचे पुजारी पूजा करून तेथून निघून गेले होते. यानंतर देवीच्या डोक्यावरून मुकुट चोरीला गेल्याचे सफाई कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. जशोरेश्वरी मंदिर हे भारत आणि आजूबाजूच्या देशांमध्ये पसरलेल्या ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे.

बांगलादेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, भारत या मंदिरात कम्युनिटी हॉल बांधणार आहे. हा हॉल सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले होते. तसेच वादळासारख्या आपत्तीच्या वेळी निवारा म्हणून देखील या हॉलचा वापर करता येणार होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *