राजकीय मतभेद असू शकतात, पण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही नीच पातळीवर जाऊन कुणावरही खालच्या भाषेत टीका करण्याची परंपरा नव्हती. मात्र, भाजपच्या सत्तेच्या मस्तवालपणाने काही जण आपली लायकी विसरत चालले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते आणि जनतेच्या मनातील विश्वासार्ह नेतृत्व असलेल्या जयंत पाटील यांच्याविषयी केलेली जहरी टीका ही केवळ असभ्य नव्हे, तर त्यांच्या मानसिक संतुलनावरही प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. शिष्टाचार, राजकीय संयम आणि सभ्यता सोडून, पडळकर आता सरळ गलिच्छ भाषेत धमक्या देऊ लागले आहेत. “टप्प्यात आणून कार्यक्रम करू” असे म्हणत त्यांनी लोकशाही मुल्यांचा पुरता विसर पडलेला दिसतो. पण पडळकर आणि त्यांच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे, जनता तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, उलट या अहंकाराचा योग्य समाचार घेईल! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले.
आणखी काय म्हणाले ॲड. अमोल मातेले ?
कोणाचा कार्यक्रम कोण करतो, हे जनता ठरवते! जयंत पाटील यांनी आयुष्यभर लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून जनतेसाठी काम केले आहे. त्यांनी सत्ता, संपत्ती आणि दबावाच्या जोरावर नव्हे, तर जनतेच्या विश्वासाच्या आधारावर आपले राजकीय स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपच्या चमच्यांनी काहीही म्हटले, तरी त्यांच्या चार असभ्य शब्दांनी जयंत पाटलांचे काहीही बिघडणार नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी म्हटले आहे.
गोपीचंद पडळकर हे कुणाच्या इशाऱ्यावर नाचत आहेत, हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील जनता भीक घालत नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात योगदान काय? कुणाच्या जीवावर आमदारकी मिळवली आणि कुणाच्या जीवावर नालस्तीचे राजकारण करत आहात? पडळकर, तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला नेहमी कोणावर तरी वैयक्तिक टीका करावी लागते. तुमच्या पक्षात किती किंमत आहे, हे जनतेला ठाऊक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा विचारधारेवर चर्चा होत असते, तेव्हा तुम्ही भाटगिरी आणि गुलामगिरी करण्यात मग्न असता.
सत्तेचा मस्तवालपणा जिरवायचा की नाही, हे जनता ठरवेल!भाजपवाल्यांनी नीट ऐकून घ्यावं – सत्ता जिंकली म्हणजे महाराष्ट्रही विकत घेतलाय, असा तुमचा गैरसमज असेल, तर जनता तुम्हाला जागा दाखवेल. जयंत पाटील यांच्यासारख्या अभ्यासू, शांत, तडफदार नेतृत्वावर बेताल टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःचा आरसा बघावा. तुमच्यात दम असेल, तर गल्लोगल्ली फिरा आणि जनतेचा रोष काय असतो, हे अनुभवा!
एक शेवटचं स्पष्ट सांगतो – महाराष्ट्राच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.जर पुढील वेळी पडळकर किंवा त्यांच्या पक्षातील कोणी अशाच प्रकारे वाचाळ वक्तव्ये केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून उत्तर देईल. लोकशाही टिकवण्यासाठी आणि संस्कृतीचा दर्जा राखण्यासाठी महाराष्ट्रातील जनता हे सत्तेच्या मस्तवालांना योग्यवेळी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही!