राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पहायला मिळाले. यासाठी त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं निमित्त ठरलं. अजित पवार घरवापसी करणार का? असा प्रश्न एका पत्रकारानं त्यांना विचारला. त्यानंतर संतापलेल्या सुनील तटकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली. तसंच तुम्ही असा प्रश्न कसा विचारु शकता? असा सवालही पत्रकाराला केला. पत्रकार परिषदेची एका मर्यादा असते. पत्रकार आणि बोलणाऱ्या नेत्यांमध्ये एक योग्य संवाद असायला हवा असंही मत त्यांनी मांडलं.
अजित पवार घरवापसी करणार का? असा प्रश्न विचारण्यात आलं असता सुनील तटकरे म्हणाले की, “मी तुम्हाला विनंती करु इच्छितो की, पत्रकार परिषदेची एका मर्यादा असते. आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करु नका. आम्ही निर्णय घेतला असून त्यानुसार वाटचाल करु. त्यामुळे तुम्ही असे प्रश्न विचारु नका. पत्रकार आणि बोलणाऱ्या नेत्यांमध्ये एक योग्य संवाद असायला हवा. तुम्ही असे प्रश्न विचारता कामा नये. तुम्हाला हे कसं काय वाटलं ते सांगा”.