Breaking News

ईव्हीएम सेट केलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर…; सुषमा अंधारे यांनी भाजप समर्थकांना झोडपले!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला दिसून आला तर महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत २३५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या निकालानंतर देशभरात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक पक्षांनी तसेच नेत्यांनी ईव्हीएम हटवण्याची मागणी लावून धरली आहे. काँग्रेसने ईव्हीएम हटवण्यासाठी देशपातळीवर मोहीम आखली आहे. मात्र भाजपसह सत्ताधारी मित्रपक्ष विरोधकांचे आरोप फेटाळून लावत ईव्हीएमचे समर्थन करत आहेत. सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप समर्थकांना सवाल करत संताप व्यक्त केला आहे.

“कुणावरही ईडीची धाड पडली की, भाजपचे लावारिस भक्तुल्ले चेकाळून म्हणतात, कर नाही त्याला डर कसली? मग लोकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतल्यावर आपापल्या नेत्यांना सांगा ना, घ्या बॅलेटवर निवडणुका””तुम्ही ईव्हीएम सेट नाही केले. तुमच्यासोबत लोकमत आहे, तर बॅलेटवर सिद्ध करा. कर नाही त्याला डर कसली?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी राज्यात पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी केली. तसा मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचे नियोजन ग्रामस्थांनी केले होते. पण, प्रशासनाने अमान्य केली. याच गावात रविवारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएमच्या मुद्द्यावर सभा घेतली.

या सभेत शरद पवार म्हणाले की, लोकांच्या मनात निवडणुकीबद्दल शंका येत आहेत. त्यामुळे अशा निवडणूक पद्धतीत दुरुस्ती केली पाहिजे. जगात काय केलं जातं,त्याचा विचार केला पाहिजे, ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला लागलीय. अमेरिकेतसह युरोपातील अनेक देश ईव्हीएमवर मतदान घेत नाहीत. ते आपलं मतं मतपेटीत टाकतात. जगातील अनेक देशांनी ईव्हीएमवर मतदान घेण्याचा विचार केला,पण त्या सगळ्या देशांनी नंतर ईव्हीएम नको,असा निर्णय घेतला. याचा धडा आपण घेतला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *