बीड लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांनी बीड तालुक्यातील नाळवंडी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू होताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र, पंकजा मुंडे यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. तर लोकांमध्ये देखील पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना मोठा उत्साह पाहायला मिळाला. भाषण सुरू असताना पाऊस आला म्हणजे बीड जिल्ह्याच्या उज्वल भविष्याचा संकेत आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हणाल्या .

विरोधकांकडे सध्या कुठलाही मुद्दा नाही. त्यामुळे तुमचं मत वाया घालू नका. बीड जिल्ह्याला विकास काय असतो, हे मी दाखवून दिलंय. जात-पात धर्म सोडून मला मतदान करा. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी माझ्यासाठी आणि माझ्या परिवारातील कोणासाठी मत मागायला येणार नाही, असे देखील यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये देशात अनेक मोठमोठ्या नेत्यांची तिकीट कापली. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी मला संधी दिली आहे. त्यामुळे मोदीजींनी जी संधी मला दिली तीचे आपण सोनं करू आणि बीड जिल्ह्याची जनता मला मान खाली घालायला लावणार नाही, असा विश्वास देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय.