“शेअर मार्केटमध्ये निकालाच्या दिवशी सर्वात मोठा घोटाळा झाला आहे”, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी एक्झिट पोल समोर आले होते. या सर्व एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीला ३०० च्या आसपास जागा दाखवल्या होत्या. त्यानंतर शेअर मार्केट अचानक मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. मात्र, ४ जूनला निवडणुकीच्या निकाला दिवशी शेअर मार्केट अचानक खाली पडलं. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं.

काय म्हणाले राहुल गांधी ?

“निवडणुकीच्या आधी एक्झिट पोल समोर आले तेव्हा शेअर मार्केट अचानक वाढलं. मात्र, निकालाच्या दिवशी शेअर मार्केट अचानक पडलं. पण त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि निर्मला सीताराम यांनी शेअर खरेदी करण्यासाठी सांगितले”, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. “त्यांनी लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावली. पण ४ जून रोजी काय होणार? निवडणुकीचे निकाल काय येणार? हे त्यांना माहिती होतं. त्यानंतर शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात खाली पडलं. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

यावेळी राहुल गांधी यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला का लावली? पाच कोटी लोक जे शेअर मार्केडमध्ये गुंतवणूक करतात. त्यांना नरेंद्र मोदींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला का सांगितलं?” असे सवाल त्यांनी केले. तसेच ते पुढे म्हणाले, “त्यांनी दोन चॅनलला मुलाखती दिल्या, ते चॅनल अदानींचे आहेत. त्यामुळे यामध्ये त्या चॅनलचा रोल काय आहे? एक्झिट पोल समोर आले आणि परदेशातील गुंतवणूक वाढली, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एक्झिट पोल यांचा काय संबंध आहे? याची चौकशी कऱण्याची मागणी आम्ही करत आहोत”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

“संपूर्ण भारत या मागचं सत्य जाणून घेऊ इच्छित आहे. खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिमाण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, निर्मला सितारामण यांनी शेअर मार्केटवर टिप्पणी केल्यामुळे आधी मार्केट वरती गेलं आणि ४ जून रोजी मार्केट खाली आलं. यामध्ये ४ तारखेला तब्बल ३० लाख कोटी रूपयांचं नुकसान झालं”, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला. दरम्यान, हा देशातील मोठा घोटाळा असून याची जेपीसी समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना केली.