राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. मानखुर्द येथील सोनापूर, जनकल्याण सोसायटी, प्रभाग १४२ या ठिकाणी देखील बऱ्याच महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसून येते. दरम्यान, सोनापूर, जनकल्याण सोसायटी, प्रभाग १४२ या ठिकाणी बऱ्याच महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित असून मानखुर्द छ. शिवाजी महाराजनगर विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर, स्थानिक शाखाध्यक्ष सनी शिंदे, उपशाखाध्यक्ष जितेंद्र मुढे, कैलास खुडे यांनी मनपा अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून सतत जनतेच्या आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये दुवा म्हणून काम केले. तसेच प्रसंगी पाण्याचे टँकर देखील आणले.

पाणी सुरळीत नाही झाले तर मनसे आंदोलन छेडणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यावेळी स्थानिक महिलांनी या आंदोलनात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले. त्यामुळे मनसेच्या या पाणी प्रश्नाला जनतेची साथ असून अधिकाऱ्यांनी अंत पाहू नये,अन्यथा महापालिकेत घुसू आणि पाणी ही मूलभूत गरज कशी आहे हे दाखवून देऊ व याठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याला मनपा अधिकारी जबाबदार राहतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असा इशारा मनसैनिकांनी दिला आहे.