kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कवी कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत होणार मराठी विश्व संमेलन !

मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार आणि प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता चौथे मराठी विश्व संमेलन कवी कुसुमाग्रजांच्या कर्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये होत आहे. 27, 28 फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी हे संमेलन गंगापूर नाशिकच्या मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे, याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी (27 फेब्रुवारी) अर्थात मराठी भाषा दिनानिमित्त मराठी विश्व संमेलन नाशिकमध्ये पार पडणार आहे. मराठी साहित्य, भाषा, संस्कृती आणि कला यांना एक दीर्घ परंपरा आणि स्वतंत्र ओळख आहे. महाराष्ट्राच्या या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरीक कला अभिव्यक्त व्हाव्यात, इतर उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे एक भव्य स्नेहसंमेलन संपन्नाचं आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र सरकारकडून मराठी विश्व संमेलनाचं आयोजन करण्यात येते.

नाशिकमध्ये होणार संमेलन हे चौथ संमेलन असणार आहे. या संमेलनात मराठी संस्कृती आणि मराठी भाषा यांच्याबाबत चर्चासत्र, मराठी संस्कृतीचे प्रदर्शन करणारे नाट्यसंगीत, वादन इतर विविध कलांचा अविष्कार त्याचप्रमाणे विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आलं आहे. 2023 पासून मराठी विश्व संमेलन सुरू झाले. 2023 (वरळी)मुंबई 2024 (वाशी) मुंबई 2025 पुणे येथे हे संमेलन संपन्न झालं होतं.

“राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होत आहे. आम्ही एकूण चार दिवस साजरा साजरा करण्याचा निर्णय घेतला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी तीरावर संमेलन घेत आहोत. या संमेलनात आम्ही 35 पुरस्कार देत आहोत. याची घोषणा मुंबईमधून होईल. नाशिकमधून विशेष पुरस्कार आम्ही देणार आहोत. संमेलनाची खरी सुरुवात 23 तारखेला होईल. मराठी बोली भाषा संगम होणार असून विविध भाषांचे सादरीकरण होईल. शोभा यात्रा होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थिती उद्घाटन होईल. या संमेलनात विविध प्रकारचे परिसंवादासह विविध कार्यक्रम होणार आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनानं इथल्या स्थानिकांना फायदा होईल. यामधून रोजगाराची निर्मिती नाशिकमध्ये होईल”, असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.