महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आपला उमेदवार जाहीर केला आहे.

राज ठाकरे यांनी ठाण्यातून अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. जाधव आणि राजू पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरताना ते स्वतः हजर राहणार आहेत. राज ठाकरेंच्या या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तसेच आता मनसेच्या तिसऱ्या यादीवर हात फिरवला जातोय. उद्या जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीला कोणत्याही अटी-शर्थीशिवाय पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. आता राज ठाकरेंनी लोकसभेला केलेल्या मदतीची बिनशर्त परतफेड महायुतीकडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मनसेच्या काही उमेदवारांना पाठिंबा देण्यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची शनिवारी रात्री बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री शिंदे-फडणवीस आणि ठाकरे यांच्यात विधानसभेच्या रणनितीबाबत चर्चा झाली. या बैठकीत काही मतदारसंघाबाबत मनसे-महायुती युतीबाबत खलबतं झाली. दोन तास झालेल्या या चर्चेत शिवडी, वरळी आणि माहिम या मतदारसंघासह इतर काही जागांबाबत चर्चा झाली आहे. आता महायुती आणि मनसे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवडी मतदारसंघातून मनसे नेते बाळा नांदगावकर निवडणूक लढवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *