kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

एमपीएससीची २८ सप्टेंबरची राज्यसेवा परीक्षा ९ नोव्हेंबरला होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२५ पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे. यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा पहिल्यांदाच २८ सप्टेंबरला होणारा आहे. मात्र अभ्यासक्रमात बदल झाल्यानंतरच्या या पहिल्याच परीक्षेवर विघ्न येण्याची शक्यता आहे. राज्यभरातील लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. ऐन परीक्षा तोंडावर आली असतानाच राज्याच्या विविध भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या वतीने आयोगाला विनंती अर्ज पाठवण्यात आले होते. त्यानुसार आयोगाने परीक्षा पुढे ढकलली असून आता एमपीएससीची परीक्षा २८ सप्टेंबर ऐवजी ९ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. तर या दिवशी होणाऱ्या अन्न परीक्षांसाठी नवीन शुद्धिपत्रक जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २८ सप्टेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५ महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हाकेंद्रावरील ५२४ उपकेंद्रांवर आयोजित करण्यात आलेली असून सदर परीक्षेकरीता एकूण १,७५,५१६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. तथापि, महाराष्ट्र राज्यातील हवामान खात्याने येत्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असल्याने अनेक जिल्ह्यांमधील विविध गावांचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील विविध जिल्हा केंद्रावर परिक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने संयुक्तिक होणार नाही. परिक्षेकरीता ग्रामीण भागातील उमेदवारांचा सुद्धा समावेश असल्याने या पुरजन्य परिस्थितीमुळे विद्याव्यांना त्यांच्या परिक्षाकेंद्रावर पोहोचण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. वरील सर्व परिस्थिती पाहता दिनांक २८ सप्टेंबर, २०२५ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी असे कळविण्याचे मला निर्देश आहेत, त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपरोक्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्रस्तुत परीक्षा दिनांक २८ सप्टेंबर, २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती, तथापि, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासुन वंचित राहू नये यासाठी शासनाने पत्र अन्वये केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, २८ सप्टेंबर, २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात येईल.

उपरोक्त परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा सुधारित दिनांक शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.