मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीतील अत्यंत महत्वाकांक्षी ठरणाऱ्या शहराच्या पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. मुंबई मेट्रो-३ अर्थात मेट्रोच्या अॅक्वा लाइनचं आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचं औपचारिक उदघाटन झालं. यात पंतप्रधान मोदींनी बीकेसी ते सांताक्रूझपर्यंत भुयारी मेट्रोतून प्रवास केला.
पंतप्रधान मोदींनी बीकेसी ते सांताक्रूझ प्रवासात शालेय विद्यार्थी, महिला आणि मेट्रो-३ साठी काम केलेल्या कामगारांशी संवाद साधला. मुंबई मेट्रो-३ ही मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्याची लाइफलाइन ठरणार असल्याचं मोदींनी म्हटलं. तसंच मेट्रो-३ चं ६० टक्के काम हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातच पूर्ण झालं होतं. पण त्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं अहंकारापोटी काम रोखून धरलं. महायुती विकास कामांना पुढे घेऊन जाणारं सरकार असून महाविकास आघाडी सरकार विकास कामांमध्ये खोडा घालणारं सरकार असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली.
मुंबई मेट्रो-३ चं आज औपचारिकरित्या लोकार्पण झालं आहे. यानंतर सोमवारपासून मुंबईकरांना आरे ते बीकेसी असा प्रवास करता येणार असल्याचं सांगितलं जात आहे. आरे ते बीकेसी प्रवासासाठी ५० रुपये तिकीट असणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १० स्थानकांचा समावेश आहे. तर या मार्गावर दर साडे सहा मिनिटांनी गाडी धावणार आहे. या मेट्रो लाइनमधून एकूण १७ लाख प्रवासी प्रवास करतील असा दावा करण्यात आला आहे. ज्या ठिकाणांना रेल्वेनं जोडता आलेलं नाही अशा ठिकाणांना मेट्रो लाइननं जोडलं गेलं आहे. याचा सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.
कुठे किती भाडे?
१. आरे जेव्हीएलआर ते मरोळ नाक्यापर्यंतच्या अंतरासाठी प्रवाशांना २० रुपये भाडे द्यावे लागणार आहे. तर आरे जेव्हीएलआर स्थानकापासून विमानतळ टी १ टर्मिनल स्थानकापर्यंत ३० रुपये भाडे आकारले जाणार आहे.
२. त्यातच वांद्रे कॉलनी स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी प्रवाशांना ४० रुपये मोजावे लागणार आहेत.
कधी सुटणार गाडी?
- मेट्रो-३ मार्गिकेवरुन पहिली गाडी सकाळी ६.३० वाजता सुटेल
- शेवटची गाडी रात्री १०.३० वाजता सुटेल
पहिल्या टप्प्यात कोणकोणती स्थानकं?
- सीप्झ
- एमआयडीसी अंधेरी
- मरोळ नाका
- सीएसएमआयए टी२
- सहार रोड
- सीएसएमआयए टी१
- सांताक्रूझ
- वांद्रे कॉलनी
- बीकेसी