kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त दिसतात – संजय राऊत

महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी कितीही सभा घेतल्या, कितीही फिती कापाव्या, कितीही थापा माराव्यात. पण या राज्यातील जनतेने ठरवलेलं आहे की थापेबाजी बंद झाली पाहिजे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. यावरुन संजय राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त दिसतात. हरियाणा, जम्मू काश्मीरमधील निवडणूक ते हरतात. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड या निवडणुका होणार आहेत. हरियाणापेक्षा अधिक दणदणीत पराभव त्यांचा महाराष्ट्रात होणार आहे”, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.

“राज्यात काँग्रेसच जिंकणार. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी कितीही सभा घेतल्या, कितीही फिती कापाव्या, कितीही थापा माराव्यात. पण या राज्यातील जनतेने ठरवलेलं आहे की थापेबाजी बंद झाली पाहिजे. मला तर सतत भीती वाटते की निवडणूक काळात हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय? कारण हे दिल्लीत टिकतंच नाहीत”, असेही संजय राऊत म्हणाले.

“देशाच्या पंतप्रधानांनी कुठे आणि किती वेळा जावं याचा काही शिष्टाचार आहे. पुण्यात एकाच मेट्रोचे सहा वेळा उद्घाटन करण्यात आले, हे त्यांना कसं काय जमतं मला त्याची कल्पना नाही. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन सतत खोटं बोलतात. काल ठाण्यात बोलले की मी महाराष्ट्राला गोड बातमी घेऊन आलो आहे. राज्या राज्यात तुम्ही गोड बातम्या घेऊन येत आहे. मोदी पंतप्रधान असले तरी ते पदाला न शोभणारी वक्तव्य करत आहेत”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या संस्कृतीत खोके, पाकीट संस्कृती सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील मिडिया विकत घेण्याची निती सुरू केली आहे. पत्रकारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हा महाराष्ट्र आहे. राज्यातील पत्रकार पाकीट संस्कृतीत अडकणार नाही, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला.