बिहारमधील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलं आहे. बिहार सरकारने राष्ट्रीय जनता दलाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना पाटण्यातील त्यांचा ऐतिहासिक ’10 सर्कुलर रोड’ हा सरकारी बंगला सोडण्याचा आदेश दिला आहे. मात्र, राबडी देवी यांनी हा बंगला सोडण्यास साफ नकार दिला आहे. पाटणा विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी बिहार सरकारला थेट आणि खुलं आव्हान दिलं आहे. ‘कितीही फोर्स बोलवा, पण कोणत्याही परिस्थितीत आपण आपला हा बंगला सोडणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
नुकत्याच राबडी देवी या नातू इराज याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन दिल्लीहून पाटण्याला परतल्या होत्या. विमानतळावर पत्रकारांनी त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याच्या आदेशाबाबत विचारले असता राबडी देवी म्हणाल्या, “मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी कितीही पोलीस फोर्स बोलावून घर रिकामं करून दाखवावं, मी कोणत्याही किमतीत हा बंगला सोडणार नाही.”
भाजपचे प्रदेश प्रवक्ते नीरज कुमार यांनी राबडी देवींच्या या विधानावर कडाडून टीका केली असून ते म्हणाले की, “राबडी देवीजी, आता बिहारमध्ये पूर्वीसारखं ‘जंगलराज’ उरलेलं नाही. इथे प्रत्येकाला कायद्याचे पालन करावेच लागेल. स्वतःच्या उपचारासाठी तुम्ही सिंगापूरला जाता, नातवाचा वाढदिवस साजरा करायला दिल्लीला जाता, पण जेव्हा बिहारला लुटण्याची वेळ येते तेव्हा इथे पळत येता. हे आता चालणार नाही.”
“शेवटी या ’10 सर्कुलर रोड’च्या बंगल्यात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांनी असा कोणता खजिना लपवून ठेवला आहे? जर तिथे खजिना दडला असेल, तर बिहार पोलीस तो शोधून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.” असा सवाल देखील नीरज कुमार यांनी पुढे केला.
नेमकं प्रकरण काय ??
बिहार सरकारच्या भवन निर्माण विभागाच्या आदेशानुसार, बिहार विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या या नात्याने राबडी देवी यांच्यासाठी पाटण्यातील ’39 हार्डिंग रोड’ येथील नवीन सरकारी आवास अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे. हे नवीन घर आधीच त्यांच्या नावावर जारी झाले असूनही, त्यांनी अद्याप जुना ’10 सर्कुलर रोड’ हा बंगला सोडलेला नाही. लालू यादव यांचे संपूर्ण कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून म्हणजेच 2005 सालापासून याच ’10 सर्कुलर रोड’ बंगल्यात राहत आहे. गेल्या 6 महिन्यांत प्रशासनाने त्यांना नवीन बंगल्यात शिफ्ट होण्यासाठी 2 ते 3 वेळा लेखी विनंती केली होती, मात्र तरीही लालू कुटुंबीयांनी हट्ट सोडलेला नाही.













Leave a Reply