kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कोल्हापूर जिल्ह्यात फक्त ८० मंडळांनीच अधिकृत वीज जोडणी घेतली

कोल्हापूर शहर, जिल्ह्यातील दहा हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप, रोषणाई, होर्डिंगसाठी अनधिकृत वीजजोडणी घेतल्याचे समोर आले आहे. केवळ ८० मंडळांनीच महावितरण प्रशासनाकडून अधिकृत वीज जोडणी करून घेतली आहे. अनधिकृत वीज जोडणीत धोका असल्याने संबंधित मंडळांनी गणेशोत्सव आनंददायी, निर्विघ्न पार पडण्यासाठी तातडीने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी करून घ्यावी, असे आवाहन महावितरण प्रशासनाकडून केले आहे. शहरातआणि जिल्ह्यात ८,५०० हजार सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मात्र बुधवारअखेर फक्त ८० मंडळांनीच अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. उर्वरित मंडळांनी जवळपासच्या घरातून, विजेच्या खांबावरून वीजजोडणी करून घेतली आहे.

व्यावसायिक दराने वीजबिलाची आकारणी होईल, म्हणून अनधिकृत वीजजोडणी करण्याकडे कल अधिक असतो. पण यंदा महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सार्वजनिक गणेश मंडळांनी तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी घेतल्यास घरगुती दराने वीजबिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीजजोडणी घेतल्यास सुरक्षितता अधिक असते. म्हणून उत्सव काळात मंडप, रोषणाई, होर्डिंग, देखावे, महाप्रसाद आदी कारणांसाठी लागणारी वीजजोडणी अधिकृत कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी, असे आवाहन वीज प्रशासनाने केले आहे. याला शहर आणि जिल्हयातील केवळ ८० मंडळांनीच प्रतिसाद दिल्याचे महावितरणच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे.

अधिकृत वीजजोडणी घेतलेल्या मंडळांची विभागनिहाय संख्या पुढीलप्रमाणे :
कोल्हापूर शहर विभाग : ५०, ग्रामीण एक : ६, ग्रामीण दोन : ३, जयसिंगपूर : १०, इचलकरंजी : ०, गडहिंग्लज : ११.