kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पंतप्रधान मोदी आजपासून इस्रायलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर ; संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य असेल प्रमुख अजेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इस्रायलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नऊ वर्षांतील हा त्यांचा दुसरा दौरा असेल. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः अमेरिका आणि इराणमधील बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने होणारा हा दौरा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी इस्रायलसोबत मुक्त व्यापार करारावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या मुद्द्यावर चार दिवसांची बैठक सुरू आहे, जी 26 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान इस्रायली संसदेला संबोधित करतील, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी व्यापक चर्चा करतील आणि राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग यांचीही भेट घेतील.

नेतान्याहू बुधवारी रात्री मोदींच्या सन्मानार्थ खासगी डिनरचे आयोजन करतील. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत असल्याचे नमूद केलंय.परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की, ही भेट दोन्ही देशांमधील खोल आणि दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांना पुन्हा दृढ करेल आणि सामायिक आव्हानांचा आढावा घेण्याची आणि मजबूत भागीदारीसाठी सामायिक दृष्टिकोन पुढे नेण्याची संधी प्रदान करणार आहे.

संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य प्रमुख अजेंडा सूत्रांनुसार, प्रतिनिधिमंडळ पातळीवरील चर्चेदरम्यान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हा एक प्रमुख अजेंडा असेल. भारत स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली, सुदर्शन चक्र विकसित करण्याच्या दिशेने काम करीत आहे आणि या संदर्भात इस्रायलच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली, आयर्न डोमचे घटक समाविष्ट करण्याची शक्यता देखील चर्चा केली जाऊ शकते. पंतप्रधान मोदींचा इस्रायलचा पहिला दौरा जुलै 2017 मध्ये झाला होता, ज्या दरम्यान द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर नेतन्याहू जानेवारी 2018 मध्ये भारताला भेट दिली.