Breaking News

पंतप्रधान मोदी हा एक लटकता आत्मा; शरद पवार समजून घ्यायला त्यांना 100 जन्म घ्यावे लागतील – संजय राऊत

पंतप्रधान मोदी हा एक लटकता आत्मा आहे. तो इकडे-तिकडे लटकत फिरत आहे. त्या लटकत्या आत्म्यासोबत आमचे महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधीच जाणार नाहीत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मोदी यांना आपण नक्की कुठे लटकत आहोत, हे नक्की समजतच नाही. त्यांची वक्तव्यं बघा, ते आज एक बोलत आहेत, उद्या एक बोलतात, काल एक बोलून गेले. मला तर वाटतंय की, नरेंद्र मोदींची प्रकृती बरी नाही. भाजपमधील सहकाऱ्यांनी त्यांची प्रकृती नीट तपासून घ्यावी. त्यांना उपचार आणि विश्रांतीची गरज आहे, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न 4 जून रोजी भंग होणार आहे. ते पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांना आता कळून चुकले आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये मोदींनी देशाच्या स्वप्नाची वाट लावली आहे. मोदींना सत्तेतून हटवणे हे माझे स्वप्न आहे. देशातील हुकूमशाही हटवून आम्हाला संविधान वाचवायचे आहे. मोदींना संविधान संपवायचे आहे. त्यामुळे त्यांना खुर्चीवरून खाली खेचणे, हे आमचे स्वप्न आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपला स्वाभिमान सोडून आणि राष्ट्रहिताचा बळी देऊन कधीच नरेंद्र मोदींसोबत जाणार नाहीत. मोदींना आता त्यांचा पराभव दिसू लागला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे मोदींना कधी घाबरणार नाहीत. जे घाबरणारे होते, ते मोदींसोबत गेले आहेत. शरद पवारांना समजून घेण्यासाठी मोदींना 100 जन्म घ्यावे लागतील. मोदींची इमेज ही रुपयासारखी घसरत चालली आहे. मोदींनी शरद पवार यांना ऑफर दिली आहे. अशी ऑफर देणारी व्यक्ती बालबुद्धी असते. त्यामुळे यावरुन मोदींची बुद्धी लक्षात येते, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब ठाकरे यांच्याबद्दल यांच्याबाबतीत अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केले आहे. बाळासाहेब आणि माँसाहेब अत्यंत देवतासमान अशी व्यक्तिमत्व होती. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांना महाराष्ट्र पुजतो. त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो, तुम्ही औरंगजेबाची संतान आहात, तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात, तेलंगणात जाऊन महाराष्ट्राबद्दल अशा प्रकारची भाषा करणे हे बरोबर नाही, असे राऊत यांनी म्हटले.