Breaking News

राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली!

10 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील परभणीत आंबेडकरांच्या स्मारकाची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेच्या 12 दिवसांनी आज (23 डिसेंबर) काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत पोहोचले. राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली. 15 डिसेंबर रोजी पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ?

राहुल गांधी म्हणाले की,, ‘मी पीडितांच्या कुटुंबीयांना भेटलो, त्यांनी मला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फोटो-व्हिडिओ दाखवले, सोमनाथचा मृत्यू हा 100 टक्के कस्टोडिअल डेथ आहे, त्याची हत्या पोलिसांनी केली आहे. पोलिसांना संदेश देण्यासाठी मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलले आहेत. राहुल म्हणाले की, सोमनाथची हत्या झाली कारण तो दलित होता आणि संविधानाचे रक्षण करत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही राज्यघटना नष्ट करण्याची आहे. हा प्रश्न सुटावा आणि ज्यांनी हे केले त्यांना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे.

दरम्यान, बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आक्रोश सुरु आहे. या भयंकर हत्येनं रणकंदन सुरु असताना राहुल गांधी आज परभणीत आल्याने बीडला सुद्धा भेट देतील अशी शक्यता होती. मात्र, बीडकडे राहुल गांधी यांनी पाठ फिरवल्याने चर्चा रंगली आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्येही चर्चा रंगली आहे. आजवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दोन्ही जिल्ह्यात भेटी दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दोन्ही जिल्ह्यात भेट देत पीडितांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भेट दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी सुद्धा बीडला भेट देत देशमुख कुटुबीयांना भेटतील अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी भेट दिली नाही.

राहुल गांधींच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी केवळ राजकीय कारणासाठी येथे आले होते. लोकांमध्ये द्वेष निर्माण करणे हे त्यांचे काम आहे. आम्ही सर्व प्रकरणांचा तपास करत आहोत. प्रकरण न्यायालयात आहे. पोलिसांच्या हल्ल्यात सोमनाथचा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले तर कुणालाही सोडले जाणार नाही. ते म्हणाले की, परभणी हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश राज्य सरकारने यापूर्वीच दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *