Breaking News

अमित शहा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ ; कोर्टाने दिले आदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोरील अडचणीत वाढ होणार आहे. शुक्रवार 26 जुलै रोजी त्यांना सुलतानपूर न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. सकाळी 10 वाजता ते न्यायालयात हजर राहू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. राहुल गांधी यांनी शाह यांच्यावर खुनी असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात भाजपचे तत्कालीन सुलतानपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. कोर्टाने त्यांचा दावा मान्य करत राहुल गांधी यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले होते.

राहुल गांधी यांनी 20 फेब्रुवारी रोजी अमेठीमध्ये त्यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ थांबवली आणि या प्रकरणी खासदार-आमदार न्यायालयात ते हजर झाले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या याचिकेवर पुन्हा 2 जुलै रोजी सुनावणी झाली. या दरम्यान सुलतानपूर न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना शेवटची संधी दिली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या वकिलाने संसदेत व्यस्त असल्याचे कारण देत पुढील तारीख देण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य करत 26 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. न्यायालयाने राहुल गांधी 26 जुलै रोजी प्रत्यक्ष हजर झाले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे म्हटले होते.

राहुल गांधी यांचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी सांगितले की, सुलतानपूरच्या खासदार-आमदार न्यायालयात गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात अशोभनीय टिप्पणी केल्याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी कोर्टाने वैयक्तिकरित्या बोलावले आहे. त्यामुळे सुलतानपूरच्या विशेष खासदार आमदार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राहुल गांधी 26 जुलै रोजी न्यायालयात हजर रहाणार आहेत. तर, भाजप नेते विजय मिश्रा यांचे वकील संतोष कुमार पांडे म्हणाले की, राहुल गांधी यांच्याविरोधात पुरेसे पुरावे आढळल्यास त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते असे सांगितले.