पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज काँग्रेसला रामराम केला आहे. काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं आहे की त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या काही दिवसांत ते शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करण्याची शक्यता आहे.

रवींद्र धंगेकर आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. ते मूळचे शिवसैनिक असून आता ते स्वगृही परतणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

रवींद्र धंगेकर यांनी पक्ष सोडल्यामुळे पुणे काँग्रेसची मोठी हानी झाली आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे २०२३ मध्ये या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे ११ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले होते. त्यांनी आमदार म्हणून कसबा पेठसह पुण्यातील अनेक सामाजिक प्रश्न मांडत लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मागील काही वर्षांपासून त्यांनी जिल्ह्यात काँग्रेसची बाजू लावून धरली होती.

खरतर, २०२३ च्या आधी २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र काँग्रेसला मोठी गळती लागली होती. त्या काळात पक्षातील अनेक मोठे नेते पक्ष सोडून भाजपा व शिवसेनेत सहभागी झाले होते. मात्र, धंगेकरांनी जिल्ह्यात काँग्रेसचं अस्तित्व टिकवून ठेवलं होतं. मात्र आता त्यांच्या जाण्याने पुण्यात काँग्रेसकडे मोठं नेतृत्व राहिलेलं दिसत नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर, रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत आणि राज ठाकरे यांना साथ देत मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या २००७ आणि २०१२ मधील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत धंगेकर हे मनसेच्या तिकिटावर मोठ्या मतफरकाने निवडून आले होते. याच काळात त्यांनी २००९ व २०१४ ला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपा उमेदवार व तत्कालीन आमदार गिरीश बापट यांना कडवी झुंज दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *