हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित हॉरर-कॉमेडी ‘भूत बंगला’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 2026मधील ‘भूत बंगला’ सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक असून याला रिलीजपूर्वी प्रचंड प्रेम मिळत आहे. 16 वर्षांच्या कालावधीनंतर अक्षय कुमार हा दिग्दर्शक प्रियदर्शनबरोबर मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी या जोडीनं ‘हेरा फेरी’,’हलचल’,’खट्टा मीठा’, ‘चुप चुप के’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’ आणि ‘दे दाना दान’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. हे चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडले होते. आता प्रेक्षकांना हॉरर-कॉमेडी ‘भूत बंगला’बद्दल खूप अपेक्षा आहेत.
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच, चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळं प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली आहे. ‘भूत बंगला’ची स्पेशल स्क्रिनिंग 15 एप्रिल रोजी झाली. यानंतर या चित्रपटाला पहिला रिव्ह्यू हा सोशल मीडियावर व्हायरल झाला. सुरुवातीच्या समीक्षणांनुसार, ‘भूत बंगला’ ही एक दमदार हॉरर-कॉमेडी आहे, जी हास्य आणि भीतीदायक गोष्टीमुळं प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेल. हा चित्रपट गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरल्याचं देखील अनेक यूजर्सनं सांगितलं आहे. याशिवाय या यूजर्सनं क्लायमॅक्ससुद्धा खूप धक्कादायक असल्याचं सांगितलंय.
सोशल मिडिया यूजर्सनं अक्षय कुमारच्या अभिनयाचं कौतुक केलं. एका यूजरनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘भूत बंगला’ 4 स्टार, भरपूर ट्विस्ट, हास्य आणि जागेवरून उडी मारायला लावणाऱ्या ट्विस्टसह एक दमदार हॉरर कॉमेडी. पूर्वार्ध खिळवून ठेवणारा आहे आणि क्लायमॅक्स धक्कादायक. अक्षय कुमारनं उत्तम अभिनय केला आहे. तसेच परेश रावल आणि राजपाल यादव यांनी चित्रपटाची मजा वाढवली. प्रियदर्शननं चित्रपटात मनोरंजन दिले आहेत. चित्रपटात तब्बू आणि वामिका गब्बी यांनी महत्वाच्या भूमिका केल्या , ज्यामुळं कहानीला खोली आणि ताजेपणा मिळतो. प्रियदर्शननं विनोदी चित्रपट साकारण्यातील आपले प्रभुत्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय.
दरम्यान ‘भूत बंगला’ 10 एप्रिलऐवजी एका आठवड्यानं उशिरा प्रदर्शित करण्यात येत आहे. पेड प्रिव्ह्यू 16 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता सुरू होईल. हा चित्रपट पूर्णपणे 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं U/A 16+ प्रमाणपत्र दिले आहे. हा मेगा-प्रोजेक्ट एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्स आणि अक्षय कुमारच्या केप ऑफ गुड फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित असून शोभा कपूर आणि एकता आर. कपूर या चित्रपटाच्या मुख्य निर्मात्या आहेत.














Leave a Reply