kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सतिश चव्हाण यांचे वक्तव्य पक्षहिताला बाधा आणणारे आहेच शिवाय महायुतीच्या कार्यप्रणालीला बाधा आणणारे असल्याने आज किंवा उद्या कारवाई करणार – सुनिल तटकरे

पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांने असे वक्तव्य करणे हे पक्षहिताला बाधा आणणारे आहेच शिवाय महायुतीच्या कार्यप्रणालीला बाधा आणणारे आहे. त्यामुळे व्यक्ती किती मोठी असली तरी आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत कारवाई ही केली जाईल असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिले.

आमदार सतिश चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केले.

आमदार सतिश चव्हाण यांचे पत्र वाचनात आले असून ते अत्यंत गंभीर आहे. पक्षाची शिस्त ज्यांच्याकडून भंग होईल ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. आमदार किंवा पक्षाचे वरीष्ठ नेते असतील त्यांच्याकडून अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देतानाच याविषयी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करेन शिवाय सतिश चव्हाण यांच्याशीही बोलून त्यांनी काय मानसिकतेतून हे वक्तव्य केले आहे हे जाणून घेईन. इतरवेळी न बोलता यावेळी बोलण्याचे कारण काय हेही समजून घेऊ. तरीही ते आपल्या विचारावर ठाम असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई ही केली जाईल असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

महायुतीच्या गेल्या अडीच वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीचे ‘रिपोर्ट कार्ड’ आजच पत्रकार परिषद घेऊन प्रकाशित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांनंतर पायाभूत सुविधा, उद्योग, रोजगाराची संधी व इतर लोकोपयोगी कामे विशेष करुन अवर्षण भागामध्ये सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी घेतलेले क्रांतीकारी निर्णय आणि पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे नेण्यासाठी ठोस पावले उचलली गेली आहेत. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी यश मिळणार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

कालच (मंगळवारी) निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. आज काही लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला. दिनांक १८ ऑक्टोबर पासून प्रवेशाची मालिका पक्षात सुरू होणार असल्याचे आपल्याला पहायला मिळेल असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने सामोरे जायला सज्ज झाला आहे. आम्ही २८८ मतदारसंघामध्ये पक्षाचे निरीक्षक नेमणार आहोत. जे निरीक्षक पूर्ण वेळ त्या मतदारसंघात थांबतील.जबाबदार प्रमुख पदाधिकाऱ्यांवर मतदारसंघाची जबाबदारी देणार आहोत. महायुतीमार्फत जी यादी जाहीर झाली ती तिन्ही पक्षाचे समन्वयक होते. परंतु पक्षाचे स्वतंत्र निरीक्षक आम्ही नेमणार आहोत. जेणेकरून निवडणूक प्रचारात कोणत्याही त्रुटी राहू नये याची खबरदारी घेण्यात येणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

उद्या हरियाणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्याला आम्हाला सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर महायुतीची बैठक होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा म्हणून आरती साळवी यांची निवड केली आहे. दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून अशोक सावंत यांची नियुक्ती केलेली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता प्रभावी पक्ष संघटना उभारण्यासाठी अधिक जलदगतीने सुरुवात केली असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.