लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून एनडीएला बहुमत मिळालं आहे. पण महाराष्ट्रात मात्र भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील या धक्कादायक निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मोदीजींना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊ या लोकसभेची कसर भरून काढू, असं फडणवीस म्हणालेत.