अवघ्या काही दिवसांवर राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून आरोप – प्रत्यारोपाला जोर आलेला दिसून येत आहे. अशातच, आता खुद्द शरद पवारांनी अजित पवारांना थेट इशारा दिला आहे. सर्वांचा नाद करायचा, पण…. असं म्हणत शरद पवारांनी आज टेंभुर्णी येथील सभा गाजवली.
शरद पवार म्हणाले, “१९८० सालात निवडणूक झाली. त्या निवडणुकीत माझ्या आणि सहयोगी पक्षाच्या वतीने एकंदरीत ५८ लोक निवडून आले. मी ५८ लोकांचा नेता झालो. विरोधी पक्षनेता झालो. एकदा मी चार दिवसांकरता परदेशी गेलो आणि परत आलो तर तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी काहीतरी चमत्कार केला होता. निवडून आलेल्या ५८ आमदारांपैकी ५२ आमदारांना ते घेऊन गेले. त्यामुळे सहा लोकांचा नेता राहिलो. विरोधी पक्षनेतेपद गेले.”
“आता काय करणार अशी चर्चा होती. काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो. तीन वर्षे अहोरात्र प्रयत्न केले. निवडणुकीला जे मला सोडून गेले, त्यांच्याविरोधात नव्या पिढीचे उमेदवार उभे केले. आणि मला अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या जनतेला की ते ५२ लोक निवडणुकीत पडले”, असा अनुभव शरद पवारांनी शेअर केला.
ते पुढे म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुधं पाडायचं नाही. जोरात पाडायचं. पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की, सगळ्यांचा नाद करायचा…”, असं म्हणताच समोर बसलेल्या समर्थकांमधून आवाज आला की नाद करायचा, पण शरद पवारांचा नाही.”