kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिवजयंती २०२६ : डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूक

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, धैर्य आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती यांच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण शिव परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाची सुरुवात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. दीपप्रज्वलन करून आणि शिवगर्जना देत मिरवणुकीचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे सदस्य . हेमंतदादा काळमेघ, प्राचार्या डॉ. वर्षा देशमुख, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.यानंतर भव्य मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि भगव्या पताकांच्या फडक्यात परिसर अक्षरशः भारावून गेला होता. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत शिवकालीन परंपरा जिवंत केल्याचा अनुभव दिला. काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजाऊ माता, मावळे यांची वेशभूषा परिधान करून इतिहासाचे सजीव दर्शन घडवले.

मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेले मर्दानी खेळ, लाठी-काठीचे थरारक प्रयोग, तलवारबाजीचे प्रात्यक्षिक आणि पारंपरिक युद्धकौशल्याचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. या प्रात्यक्षिकांमधून शिवकालीन शौर्य आणि पराक्रमाचे दर्शन घडले. उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या धाडसी आणि शिस्तबद्ध सादरीकरणाचे जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

प्राचार्या डॉ. वर्षा देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा आजच्या काळातील संदर्भ स्पष्ट केला. “शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना न्याय, समानता, स्त्रीसन्मान आणि लोककल्याण यांना सर्वोच्च स्थान दिले. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या ध्येयधोरणांचा अभ्यास करून समाजहितासाठी कार्य केले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ उत्सव साजरा न करता शिवरायांच्या विचारांचे आचरण जीवनात उतरवण्याचे आवाहन केले करून दिलीप बापू इंगोले यांनी आपल्या उद्घाटन भाषणातून श्री शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत तरुणाईने राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश दिला.

संपूर्ण कार्यक्रम शिस्त, समन्वय आणि उत्साह यांचे उत्तम दर्शन असल्याचे त्यांनी सांगितले.. यावेळी त्यांनी आजपासून सुरू होणाऱ्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले असे जाहीर करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य हेमंत दादा काळमेघ यांनी सांगितले की शिवजयंती उत्सव हा केवळ ऐतिहासिक स्मरणाचा दिवस नसून स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा सोहळा आहे. शिवरायांच्या विचारांची ज्योत तरुणांच्या मनात प्रज्वलित ठेवण्याचा आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संदेश या उत्सवातून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.