स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस हिंदी या रिॲलिटी शोचा विजेता मुनव्वर फारुकी सध्या बराच चर्चेत आहे. बऱ्याच वेळा वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत सापडलेल्या मुनव्वरने यावेळी पुन्हा एकदा असंच एक वादग्रस्त विधान केलं असून त्यामुळे राज्यातील वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. स्टँडअप कॉमेडी करताना मुनव्वरने कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरत त्यांची खिल्ली उडवली होती. त्याचा कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत मुनव्वरवर टीका केली होती. मनसे, शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून त्याच्या विधानावर आक्षेप घेण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्याने मुनव्वरला इशारा दिला आहे. तसेच तो जिथे दिसेल तिथे त्याला चोप द्या अशी सूचनाही त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिली असून तसेच राज्यातील नागरिकांनाही त्यांनी आवाहन केले आहे.

प्रशांत गांधी, हे मनसे मुंबादेवी विधानसभा विभाग अध्यक्ष असून त्यांनी एका व्हिडीओद्वारे मुनव्वर याच्यावर टीका करत त्याला इशारा दिला आहे. ‘ मुनव्वर फारूकी याने आज जे काही स्टेटमेंट दिलं आहे. त्याने आमच्या महाराष्ट्रातील लोकांबद्दल, आमच्या कोकणी माणसांबद्दल उलटसुलट वक्तव्य केलं आहे. स्टँडअप कॉमेजी करतो म्हणजे काही पण बोलशील का रे ? काही वर्षांपूर्वी याने हिंदू देव-देवतांबद्दल देखील असंच स्टेटमेंट दिलं होतं. अशा लोकांना महाराष्ट्र सैनिक सोडणारंच नाहीत. हाँ दिसेल तिथे त्याला चोपायचं आहे, असं मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगून ठेवलं आहे. मी सर्व जनतेलाही आवाहन करतो की अशा लोकांना सोशल मीडियावर वगैरे बिलकूल फॉलो करू नका. अशा लोकांना वेळीच रोखलं नाही तर ते असंच वाह्यात बोलत राहतील.

मी त्याला 24 तासांचा अवधी देतो, कुठे बिळात लपला असशील तर आत्ताच बाहेर पड. 24 तासांच्या आत जर त्याने या महाराष्ट्रातील जनतेची, कोकणी माणसाची माफी मागितली नाही तर राजसाहेबांचे हे महाराष्ट्र सैनिक मुनव्वर फारूकाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’ असा इशारा प्रशांत गांधी यांनी दिला.

काय आहे प्रकरण ?

एका स्टँडअप कॉमेडीदरम्यान बोलताना “मुंबईतून सर्वजण आले आहेत ना?”, असं मुनव्वरने प्रेक्षकांना विचारलं. “ कुणी लांबून प्रवास करुन आलं नाही ना?”, असा सवालही त्याने विचारला. यावेळी प्रेक्षकांमधील एकाने आपण तळोजा येथून आल्याचं सांगितलं. त्यावर मुन्नवर म्हणाला, “अच्छा, आज विचारलं प्रवास करुन आलात का? तर तळोजा म्हणून सांगत आहात. तळोजा मुंबईपासून वेगळं झालं. पण यांचे गाववाले जेव्हा यांना विचारतात की, कुठे राहतात? तर मुंबईत राहतात असं सांगतात. हे कोकणी लोकं सर्वांना चु** बनवतात”, असं वादग्रस्त वक्तव्य मुनव्वर फारुकी याने केलं. मुन्नवरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही बराच व्हायरल झाला होता. त्यावरूनच राज्यभरात रान पेटलं होतं.

त्यानंतर मुनव्वरने एका व्हिडीओद्वारे माफी मागितली आहे. माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. माझ्याकडून ते शब्द अनावधानाने निघाले होते. तसेच माझं कोकणावर अफाट प्रेम आहे, असंही मुनव्वर म्हणाला होता. मात्र त्यानंतरही राज्यातील राजकीय पक्ष अजूनही आक्रमक भूमिकेत असून त्यांची पुढची भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.