विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काठमी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
या यादीनुसार, आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम, अतुल भातखळकर यांना कांदिवली पूर्व, राम कदम यांना घाटकोपर पश्चिम, मीहिर कोटेचा यांना मुलूंड, गणेश नाईक यांना ऐरोली, रविंद्र चव्हाण यांना डोंबिवली, चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.
भाजपाने मराठवाड्यातील १६ जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यापैकी भोकर आणि फुलंब्री हे दोन मतदारसंघ सोडले, तर उर्वरित १४ मतदारसंघात भाजपाने विद्यमान आमदारांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. फुलंब्री मतदारसंघात अनुराधा चव्हाण यांना, तर भोकर मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात गेले अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय भाजपाने संभाजीनगर किनवटमधून भीमराव केराम, नायगावमधून राजेश पवार, मुखेडमधून तुषार राठौड, हिंगोलीतून तान्हाजी मुटकुळे, जिंतुरमधून मेघना बोर्डीकर, परतूरमधून बबनराव लोणीकर, केजमधून नमिता मुंदडा, निलंगातून संभाजी पाटील निलंगेकर, बदनापूरमधून नारायण कुचे, भोकरदनमधून संतोष दानवे, औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे, गंगापूरमधून प्रशांत बंब, औसा- अभिमन्यू पवार आणि तुळजापूर राणाजगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपाने पुण्यातील तीन मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना तर पर्वती विधानसभा मतदारसंघांमधून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाने नुकताच जाहीर केलेल्या पहिल्या यादीत १३ महिलांना संधी देण्यात आली आहे. श्रीगोंदामध्ये प्रतिमा पाचपुते, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, जिंतूर मेघना बोर्डीकर, गोरेगाव विद्या ठाकूर, बेलापूर मतदारसंघातून बेलापूर मंदा म्हात्रे, चिखली श्वेता महाले, दहिसर मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिम सीमा हिरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड, फुलंब्री अनुराधा चव्हाण आणि भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.