सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते, गांधीवादी समाजसेवक, असंघटित मजुरांच्या हक्कासाठी लढणारे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांचे निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक यासह सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. हमाल पंचायत, कागद काच पत्रा संघटना, रिक्षा पंचायत अशी नावं घेतली की त्याच्या बरोबरीनं आठवणारं नाव म्हणजे बाबा आढाव.बाबांनी उभारलेल्या या संघटना. ज्यांच्या हक्कांसाठी बाबा आढावांनी अनेक वर्ष लढा दिला त्या या संघटना. पण त्यांचा लढा फक्त एवढ्या पुरताच मर्यादित नव्हता.नोव्हेंबर 2024 मध्ये आजारपणातून उठलेल्या बाबा आढावांनी दिवसभराचा सत्याग्रह केला, मुद्दा होता निवडणुकीदरम्यान जाहीर झालेल्या योजनांचा.ही प्रक्रिया ‘लोकशाहीला नख’ लावणारी आहे म्हणत नव्वदीतही रस्त्यावर उतरणारं बाबा आढाव नावाचं वादळ आता शांत झालंय.पुण्यातल्या ‘पुना हॉस्पिटल’मध्ये गेले काही दिवस उपचार घेत असलेल्या बाबा आढावांचं 8 डिसेंबर 2025 ला रात्री साडेआठ वाजता निधन झालं.
बाबा आढाव यांच्याबद्दल …
संघर्ष, आंदोलनं, चळवळ याचा वारसा बाबा आढावांना मिळाला तो लहानपणापासूनच. महात्मा फुलेंच्या वाड्याजवळ भवानी पेठेत बाबा आढावांचा जन्म झाला.
त्यानंतर काही महिन्यांमध्येच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मग त्यांची आई आणि ते आईच्या घरी रहायला आले.
महात्मा फुल्यांचा पुतळा उभा रहावा यासाठी 1925 साली जो ठराव पुण्याच्या तेव्हाच्या नगरपालिकेत मांडला गेला त्याचे अनुमोदक बाबा आढावांचे आजोबा. त्यामुळे आजोळी पुरोगामी विचारांचा वारसा होता.
छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणार्या या कुटुंबातले बाबा आढाव सेवा दलाच्या शाखेत जायला लागले.
पुढे 1941 मध्ये शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये बाबा आढावांनी प्रवेश घेतला. तिथे भाई वैद्य त्यांचे सिनियर होते.
महात्मा गांधींचा उपवास दिनशॉ बंगल्यात सुरू झाला. त्यात सेवा दलाचा सहभाग होता. त्यादरम्यान ही चळवळ रस्त्यावरच्या शाखांमध्ये रुपांतरीत झाली. यातल्या सेवादलाच्या काही शाखांचं नेतृत्व त्या काळी बाबा आढावांकडे होतं.
जेव्हा साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठोबाचं मंदिर खुलं व्हावं यासाठी जे आंदोलन झालं त्याची जनजागृती करण्यासाठी त्या काळी खेडोपाडी फिरत होते. पुढे बाबा आढाव डॉक्टर झाले. 1955 साली बाबा आढावांचा दवाखाना हडपसर परिसरात सुरू झाला. त्याच वेळी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली होती.
बाबा आढावांनी ठरवलं की, आपल्या दवाखान्यात येणार्या रुग्णांकडून गोळा होणार्या रकमेतून लोकोपयोगी काम झालं पाहिजे. त्यामुळे थोडी रक्कम स्वत:साठी आणि उरलेली समाजकार्याला असं गणित ठरलं.पुढे बाबा आढावांनी साक्षरतेसाठी वर्ग सुरू केले. या वर्गात शिकायला येणाऱ्या लोकांना बाबा आढावांना वचन दिलं की आम्ही पुढच्या वर्षापर्यंत साक्षर होऊ आणि आम्ही ज्या कागदांवर स्वाक्षरी करू त्याचा हार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करू.
पुढच्या वर्षी साक्षर झालेल्या 14 जणांच्या सह्यांचा अर्ज घालत त्यांनी हे वचन पूर्ण केला.
घराजवळच नाना पेठ परिसरात बाबा आढावांचा दवाखाना सुरू होता. हा परिसर व्यापारी पेठा असलेला. त्यामुळे बाबांकडे येणारे पेशंट म्हणजे इथे काम करणारे कामगार आणि हमाल.
या हमालांना पुढे युनियन निर्माण करण्याची गरज वाटायला लागली. पण युनियन नाव नको, असं हमालांनी मांडलं.
त्यानंतर हमाल पंचायत हे नाव घेत संघटनेची स्थापना 1956 मध्ये झाली.
याचवर्षी हमाल पंचायतीच्या माध्यमातून पहिला लढा उभारला गेला. त्यामुळे मजुरांना किमान वेतन मिळाले आणि हमाल पंचायतीला अधिकृत श्रमिक संघ म्हणून मान्यता मिळाली.
कष्टाला मोलासह मान हवा ही डॉ. आढावांची मागणी आणि भूमिका राहिली.
एकीकडे कष्टकरी लोकांसाठी काम करत असतानाच बाबा आढाव पानशेत धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या लढ्यात उतरले.
अशा लढ्यातून पहिला प्रकल्पग्रस्तांसाठीचा कायदा संमत झाला. 1962 मध्ये डॉ. आढाव पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले
या काळात बाबा आढावांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम सुरू केलं. 1971 ते 73 मध्ये 500 गावांमध्ये एक गाव एक पाणवठा चळवळीसाठी बाबा आढाव 500 गावं फिरले.
गावातले लोक त्यांना भेटायचे आणि विचारायचे जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होता तेव्हा तर तुम्हाला खूप पैसे मिळत असतील? या गावकऱ्यांच्या प्रश्नांची आठवण बाबांना नेहमी व्हायची त्याचा ते उल्लेख करत असत.
सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या जाव्या यासाठी ही चळवळ काम करत होती.
दलितांसाठी लढत असतानाच ‘देवदासी’ आणि ‘नंदीबैल’वाल्यांसाठीदेखील हा संघर्ष उभा केला.
आणीबाणी दरम्यान बाबा आढावांना 17 नोव्हेंबर 1975 ला अटक झाली. तेव्हा संजय गांधींनी 24 तासांत झोपडपट्टी पाडा असा हुकूम काढला होता.
यावर चर्चा करण्याची मागणी करत बाबा आढावांनी वेळ मागितली. चर्चा करण्यासाठी एकत्र जमायचं निमित्त करत त्यांनी सभा बोलावली.
25 हजार लोक जमा झाले. या निर्णयाचा धिक्कार करत बाबा आढावांनी भाषण केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना अटक झाली.
येरवडा जेल मध्ये गेलेल्या बाबा आढावांच्या सोबत तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक होते. जेल मध्ये असताना बाबा आढावांनी 26 जानेवारीचा कार्यक्रमाचा आयोजित केला.
सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते, गांधीवादी समाजसेवक, असंघटित मजुरांच्या हक्कासाठी लढणारे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांचे निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक यासह सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचे आधारस्तंभ म्हणून काम केले. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघटन उभे केले. हमाल पंचायत, एक गाव-एक पाणवठा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली. त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले. ते कायम स्मरणात राहतील, त्यांचे विचार येणार्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक असलेल्या बाबा आढाव यांची उणीव सदैव भासत राहील : शरद पवार
आपल्या महाराष्ट्रात प्रागतिक ,कृतीशील विचार मांडून ते आचरणात आणणाऱ्या शिलेदारांची एक मोठी फळी आहे. भूमिका घेताना परिणामांची, प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉ. बाबा आढाव ह्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. आज जेव्हा त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांचा संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला. ‘एकाकी मजदूर’ चळवळ, कामगारांच्या हक्कांसाठीची त्यांची अखंड झुंज, समतेवर आधारित समाजरचनेचा त्यांचा ठाम निर्धार अशा सर्व भूमिकांमधून ते सतत प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत राहिले. आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेने, विद्वेषाने ग्रासलेल्या काळात बाबा आढाव ह्यांच्यासारख्या निडर, विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील. बाबा आढाव ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आढाव कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार
समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य बाबा आढाव यांनी केले. ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ त्यांनी उभी केली. सत्यशोधक चळवळीचा विचार आपल्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपला. समाजातील सर्वात तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हाच त्यांचा ध्यास होता. संघर्षमय जीवन जगत त्यांनी प्रत्यक्ष कामातून समाजवादाची मूर्त प्रतिमा उभी केली. त्यांचा आशावाद, परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे मोठे बळ होते. बाबा आढाव यांचे कार्य म्हणजे समाजहितासाठीचे निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य कसे असावे, याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून महाराष्ट्राने समाजसेवेचा महान तपस्वी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते : सुप्रिया सुळे
आदरणीय डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा, सत्यशोधकी विचारांचा मार्ग अधिक प्रशस्त केला. या विचारांची शिदोरी बाबांनी आम्हा सर्वांच्या ओंजळीत भरभरुन टाकली. ते अखेरच्या क्षणापर्यंत अगदी आजारपणातही जनतेच्या हितासाठी विशेषतः हमाल, रिक्षाचालक, कामगार, कष्टकरी आणि वंचित समूहाच्या उत्थानासाठी कार्यरत होते. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करीत होते. या सर्वांसाठी बाबा आढाव हे मोठा आधार होते. त्यांच्या जाण्यामुळे आज सामाजिक चळवळींच्या अवकाशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने देश एका वैचारीक, सत्वशील, व्रतस्थ आणि अखंड सेवाव्रती नेतृत्वाला मुकला. या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण आढाव कुटुंबियांसोबत आहोत. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली.











