kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

तुळजापूर ड्रग्स प्रकरण तापले; सुप्रिया सुळेंच्या आरोपांना राणा जगजितसिंह पाटलांचे रोखठोक उत्तर

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रकरणात मोठा हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना खुले पत्र लिहिले आहे. तुम्ही केलेले आरोप चुकीचे आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा राजकीय अपरिहार्यतेतून केल्याचा आरोप राणांनी केला आहे. दरम्यान, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर भाजपात प्रवेश करण्याच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीमध्येच होता असा देखील दावा त्यांनी केला. आता याप्रकरणात दोन्ही गट आमने-सामने आल्याचे दिसून आले आहे.

ड्रग्ज प्रकरणात उघडकीस आणण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांनाच आरोपी केल्याचा दावा त्यांनी केला. तेरणा ट्रस्ट प्रकरणी देखील आरोप खोडून काढण्याचा राणा पाटील यांनी प्रयत्न केला.काही शंका असल्यास दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा असल्याचे त्यांनी या पत्रातून आवाहन केले आहे. सुप्रिया सुळेंनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपनं घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना खुले पत्र लिहिले आणि त्यांची बाजू मांडली.

या पत्रात राणा जगजितसिंह पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर आरोप केले. अजितदादा पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत, त्याप्रमाणेच आपण सुद्धा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे. मात्र, काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहिरपणे सलग वक्तव्ये करीत आहात, असा दावा केला.

तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते, हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. त्यांच्यावर ड्रग्जप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही काढून टाकण्यात आले नव्हते. ते ही योग्यच होते, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेल्या संविधानातील तरतुदीनुसार, जोवर एखादा दोष सिद्ध होत नाही, तोवर त्या व्यक्तीला निरपराधच मानले जाते. त्यामुळेच तर आपल्या सहकारी असलेल्या राज्यातील मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप असतानादेखील आपण त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले होते, असा टोला जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला.

आपण स्वतः एवढ्या जबाबदार व्यक्ती असतानाही आपल्याकडून जे काही बोललं गेलं, ते तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या षडयंत्राला नकळत का असेना बळ देणारं आहे. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत आपण सलग दोन वेळा जे वक्तव्य केले आहेत, त्याची वस्तुनिष्ठ माहिती आपण जाणून घ्यायला हवी होती. नाहीतर ही वक्तव्ये राजकारण्याने प्रेरित ‘मीडिया ट्रायल’ करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जात असल्याचं स्पष्ट होतंय, असा आरोप जगजितसिंह पाटील यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात तुळजापूर शहरातील स्थानिक माता-भगिनींनी शहरात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराची माहिती मला दिली. त्याचवेळी हे सगळं उध्वस्त करून टाकण्याचा शब्द मी त्यांना दिला होता. त्यानुसार मी खोलात जाऊन याबाबत माहिती मिळविली. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मी स्वतः मॅसेज करून याबाबतची माहिती पुरवली व पाठपुरावा केला. तसेच, याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यासाठी विनोद गंगने यांना जोडून दिले. या व्यक्तीने हे सगळे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. दुर्देवाने पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच यात आरोपी बनविले. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करताना या बाबी आवर्जून नमूद केल्या आहेत. कोण खरे गुन्हेगार आहेत? हे अंतिमतः न्यायालय ठरवेलच, असा विश्वास आमदार महोदयांनी व्यक्त केला.