उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आल्यास त्यांना मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेन, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेच्या काळात आपण त्यांची विचारपूस केली. मोदी या सगळ्याबद्दल लाख बोलतील. पण आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते शनिवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, मोदींबद्दल लोकांमध्ये असणारी आस्था कमी होताना दिसत आहे. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण त्या कृतीत आल्या नाहीत. त्यांचा स्वभाव बेछुटपणे बोलण्याचा आहे. मग ती गोष्ट झेपेल की नाही, सरकारची आर्थिक स्थिती काय आहे? याबद्दल यत्किचिंतही विचार न करता ते अनेक गोष्टी कबूल करतात. मोदींनी 2014 मध्ये जनतेसमोर अनेक गोष्टी मांडल्या. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निर्णयांवर टीका केली. पण तेच निर्णय आज मोदीसाहेब स्वत: राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा विरोधाभास लोकांना दिसत आहे. या सगळ्यामुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

डॉ. मनमोहन सिंग यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शांतपणे आणि गाजावाजा न करता काम करायचे आणि रिझल्ट द्यायचे. मोदीसाहेब रिझल्ट देतात की माहिती नाही. पण त्यावर चर्चा,भाष्य आणि टीकाटिप्पणी करण्यात वेळ जातो. ही गोष्ट लोकांच्या लक्षात आली आहे. या वयात जो कुटुंब सांभाळू शकत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळणार, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी म्हटले की, मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं आहे? मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक आहे. पण मी त्या लेव्हलाला जाऊन बोलणार नाही. आपण कोणाबद्दल असं व्यक्तिगत बोलू नये. ते पथ्य मोदींनी पाळलं नाही म्हणून आपणही नाही पाळायचं, असं वागणं योग्य नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

राज्यात सध्या परिवर्तन होताना दिसत आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 1, राष्ट्रवादी काँग्रेसला पाच आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला एका जागेवर विजय मिळाला होता. पण यावेळेस मला वाटते की, काँग्रेसला किमान 10 ते 12 जागांवर विजय मिळेल. आम्हाला 8 ते 9 जागांवर विजय मिळेल. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या चित्रात प्रचंड फरक आहे. भाजपने त्यांचा 400 पारचा आकडाही खाली आणला आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

देशाचा पंतप्रधान कितीवेळा महाराष्ट्रात येतोय. यापूर्वी आम्ही कोणत्याही पंतप्रधानाला इतक्या वेळा महाराष्ट्रात येताना पाहिले नव्हते. मोदींचा हा तिसरा-चौथा राऊंड आहे. यावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे की, त्यांना विजयाबद्दल कॉन्फिडन्स नाही. त्यामुळे मोदींना पुन्हा पुन्हा राज्यात यावे लागत आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.