Breaking News

पाच वर्षात कसब्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू……-रवींद्र धंगेकर

कसबापेठेतील मतदारांनी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडून दिला. तथापि तरीही कसब्यात सुमारे 30 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग शिल्लक आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास कसबा पेठेतील विकासाचा हा बॅकलॉग येत्या पाच वर्षात आपण भरून काढू अशी ग्वाही आमदार रवींद्र धंगेकर यांनी मतदारांना दिली आहे.

महाविकास आघाडी इंडिया फ्रंट आणि मित्र पक्षाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कसब्यात सध्या धडाक्यात पदयात्रा सुरू आहेत. काल संध्याकाळी झालेल्या पदयात्रेच्या वेळी मतदारांशी संवाद साधताना धंगेकर यांनी ही ग्वाही दिली. ते म्हणाले की, भाजप येथील निवडणुकांत त्याचत्या जुन्या अजेंड्यावर लोकांना भुलवण्याचे काम करीत आहे. प्रत्येक वेळी त्यांचा तोच अजेंडा कायम असतो, पण विकासाचे प्रश्न कधीही पूर्णपणे मार्गी लागलेले दिसलेले नाहीत. सुमारे 30 वर्षाहून अधिक काळ ही स्थिती कसब्यातील नागरिकांनी अनुभवली आहे. त्यामुळे आता पुन्हा भाजपच्या त्याच प्रचार अजेंड्याला भुलायचे नाही असे मतदारांनी ठरवले आहे, असेही धंगेकर यांनी म्हटले आहे.

काल गवरी आळी, भाजी मार्केट गुरुवार पेठ येथून धंगेकर यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला. सुरुवातीला या भागातील स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी धंगेकर यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. नंतर ही पदयात्रा बंदीवान मारुती, कस्तुरी चौक, श्रमदान मारुती मित्र मंडळ, मीठ गंज चौकी, वाळवेकर निवास, कृष्णा हट्टी चौक, भांडी बाजार, जैन मंदिर, गाडीखाना काची आळी, रविवार पेठ, कस्तुरी चौक या भागातून काढण्यात आली. या पदयात्रेचे स्थानिक नागरिकांनी ऊतस्फूर्त स्वागत केले. हा भाग सार्वजनिक गणेश मंडळांचा भाग आहे. ठिकठिकाणीच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही धंगेकर यांना पाठिंबा देत त्यांच्या पदयात्रेचे स्वागत केले. व्यापारी, कष्टकरी, सामान्य नागरिक आदि सर्व घटकातील मतदारांचा धंगेकर यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

या पदयात्रेत बाळासाहेब मारणे, वीरेंद्र किराड, राजन काची, मिलिंद काची, सौरभ अमराळे, राजेंद्र कंगळे, रुपेश पवार, अजय पैठणकर, सुभाष थोरवे, कान्होजी जेधे, मंजिरी कोठुळे, संगीता निंबाळकर, वनीता राऊत, प्रिया देसाई इत्यादी सहभागी झाले होते.