स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी याने पुन्हा एक वाद ओढावून घेतला. मुनव्वर फारुकीने कोकणी माणसाविषयी अपशब्द वापरले. एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर त्याच्यावर विविध स्तरातून टीका झाली. तर मनसेसह भाजपने पण त्याची कान उघडणी केली. भाजपने तर त्याला पाकिस्तानमध्ये पाठवण्याची धमकी दिली. मनसेने पण त्याचे थोबाड झोडण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे वातावरण चिघळले आहे. काय आहे हे प्रकरण, नेमकं घडलं तरी काय?
स्टँडअप कॉमेडियन मुन्नावरने गेल्या आठवड्यात एक शो केला होता. त्यामध्ये त्याने कोकणी माणसांवर टीका केली होती. त्यांच्याविषयी अपशब्द वापरले. (हे कोकणी लोक *** बनवतात.) अशी अश्लाघ्य टीका त्याने केली होती. यानंतर वादाचे मोहळ उठले. अशा शब्दाचा वापर केल्याने कोकणी माणूस नाराज आणि संतप्त झाला.
भाजप नेते नितीश राणे यांनी मुनव्वरची चांगलीच कान उघडणी केली. तुझ्यासारखे हिरवे साप पाकिस्तानात पाठवायला जास्त वेळ लागणार नाही. तू कोकणातील जनतेला शिव्या दिल्या आहेस. माफी न मागितल्यास तुला पाकिस्तानला पाठवण्यास आम्हाला वेळ लागणार नाही, अशी धमकीच त्यांनी दिली.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते, आमदार आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा समाधान सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी तर मुनव्वरला मारहाण करणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर केले. पाकिस्तानप्रेमी मुनव्वरने कोकणी लोकांची माफी मागितली नाही तर जिथे दिसेल तिथे त्याला बदडणाऱ्यांना एक लाख रुपये देण्यात येतील असे सरवणकर यांनी जाहीर केले. तर मनसेने मुनव्वर जिथे दिसेल, तिथे फटकवण्याचे जाहीर केले. तर भाजपच्या नेत्यांनी पण त्याची कानउघडणी केली.
सगळीकडून हल्लाबोल सुरू झाल्याने मुनव्वर फारुकी याने त्याने वापरलेल्या अपशब्दाबाबत माफी मागितली. काही काळापूर्वी एक शो आला होता. त्यामध्ये प्रेक्षकांची संवाद साधत होते. त्यावेळी कोकणाविषयी चर्चा झाली. माझ्या बोलण्यातून गैरसमज झाला. कोकणी समुदायाबद्दल मी काहीतरी चुकीचे बोललो असे काहींना वाटते. त्यांची मी चेष्टा केली असा गैरसमज झाला. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कोकणावर माझे खूप खूप प्रेम आहे आणि मी माफी मागतो, असे फारुकीने स्पष्ट केले.