देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करत फेरफार केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेत ‘पीपीटी प्रेझेंटेशन’द्वारे सुमारे तासभर सादरीकरण केलं आणि निवडणुकांमध्ये ‘मतचोरी’ केली जात असल्याचा दावा केला.यानंतर देशभरात या विषयावरुन वादंग माजल्याचं दिसत आहे.
तासाभराची पत्रकार परिषद, मोठे आरोप आणि पुराव्यांची जंत्री
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच असा म्हटलं, “कोणत्याही सरकारला अँटी-इन्कम्बन्सीचा (सरकारविरोधी भावनेचा) सामना करावा लागतो. मात्र, एक्झिट पोल्सचे कल खोटे ठरवत आणि अँटी-इन्कम्बन्सी दिसत असूनसुद्धा अनेकदा भाजपच विजयी होत असल्याचा एक पॅटर्न दिसतो. त्यामुळे विरोधकांना निवडणुकीच्या एकंदर प्रक्रियेवर शंका होती. पण ठोस पुरावे नव्हते.”
मात्र, हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील आश्चर्यकारक निकालांनंतर या शंका आणखी बळकट झाल्याचे राहुल गांधी म्हणाले.
हा दावा करताना त्यांनी पुरावेही सादर केले आहेत. शिवाय, काही उदाहरणं देत हे ‘लोकशाहीविरोधातलं कारस्थान’ असल्याची टीकाही केली.
निवडणूक आयोगाने यावर प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधी यांचे आरोप दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं.
‘संबंधित पुरावे शपथपूर्वक सादर करावेत, जेणेकरून आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल,’ अशी पोस्ट आयोगानं एक्सवर केली.
राहुल गांधींनी केलेले 10 आरोप कोणते?
- निवडणुकीचं वेळापत्रक ठरवून नियंत्रित केलं जात असल्याचा आरोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला पहिला आरोप आहे तो निवडणुकीच्या वेळापत्रकासंदर्भातला.
हा आरोप करताना त्यांनी म्हटलं, “भारतात एक काळ असा होता की, जेव्हा ‘ईव्हीएम मशीन’ नसताना सगळा देश एकावेळी मतपत्रिकेवर मतदान करायचा. पण, आताच्या काळात महिनोंमहिने मतदानाची प्रक्रिया चालते. मतदानाचे इतके टप्पे का केले जातात, यावरून साशंकता निर्माण होते. बरेचदा अचानकच निवडणुकीचं वेळापत्रक बदललं जातं, हे सगळं निवडणूक नियंत्रित करण्यासाठी केलं जातं.”
- मतचोरी केली जात असल्याचा सगळ्यात मोठा आरोप
राहुल गांधींनी केलेला हा सगळ्यात मोठा आरोप आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मतचोरीचा संशय अधिक बळकट झाला, असं राहुल गांधींनी म्हटलंय. याला पुष्टी देण्यासाठी ते तीन मुद्दे पुढे करतात,
- 5 वर्षांत जितके नवे मतदार जोडले गेले नाहीत तितके 5 महिन्यांत जोडण्यात आले.
- संपूर्ण प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार
- मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 नंतर अचानकच मतटक्क्यात मोठ्या प्रमाणावर वाढ
- निवडणूक आयोगाकडून पुरावे देण्यास टाळाटाळ आणि पुरावे नष्ट करण्याचे काम
राहुल गांधींनी आपल्या संपूर्ण पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाला धारेवर धरल्याचं दिसून आलं. त्यांनी केलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा आरोप आहे.
ते म्हणाले, “निवडणूक आयोग मतदानासंदर्भातील रेकॉर्ड्स देण्यास टाळाटाळ करतो. तसेच मतदानाच्या ‘सीसीटीव्ही फुटेज’सारखे पुरावे नष्ट करण्याचं काम निवडणूक आयोगाकडून केलं जातंय.”
एका विधानसभा मतदारसंघांचं उदाहरण
- उदाहरणादाखल घेतलेल्या एका विधानसभा क्षेत्रात ‘1 लाख मतचोरीचा आरोप’
वरील सर्व आरोप सिद्ध करण्यासाठी राहुल गांधी यांनी जिंकण्याची शक्यता असलेल्या एका लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभेचं उदाहरण दिलंय. कर्नाटक राज्यातील बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा या विधानसभेत 1 लाख मतचोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला.
हा आरोप करताना त्यांनी 5 प्रकारे मतचोरी होत असल्याचं सांगितलं. यामध्ये, डुप्लिकेट मतदार, खोटे आणि अवैध पत्ते असलेले मतदार, एकाच पत्त्यावर भरमसाट मतदारांची नोंद, अवैध फोटो आणि फॉर्म 6 चा गैरवापर असलेले मतदार अशा 5 माध्यमांतून मतचोरी होत असल्याचा आरोप केला.
- डुप्लिकेट मतदार
वानगीदाखल घेतलेल्या महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघात 11,956 मते ही डुप्लिकेट मतदारांच्या माध्यमातून चोरली असल्याचा आरोप राहुल गांधी करतात.
याचा अर्थ असा आहे की, एकच मतदार मतदारयाद्यांमध्ये वेगवेगळ्या बूथ नंबरवर अनेकदा येतो, असं ते सांगतात. यासाठी त्यांनी काही उदाहरणंही सादर केली.
याला जोडूनच ते असाही आरोप करतात की, फक्त एकाच मतदारसंघात नव्हे, तर एकच मतदार वेगवेगळ्या राज्यांमध्येही मतदार असल्याचं दिसून येतंय.
- खोटे पत्ते
मतचोरी करण्यासाठी खोटे पत्ते असलेले कित्येक बनावट मतदार वापरले जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. या माध्यमातून महादेवपुरा या एका मतदारसंघात 40,009 मतांची चोरी केल्याचा आरोप राहुल गांधी करतात. या मतदारांचे पत्ते अस्तित्वातच नाहीयेत किंवा त्यांच्या पत्त्याच्या रकान्यात ‘0,-,#’ अशी चिन्हे दिसून येतात. हे पत्ते व्हेरिफाय न करता येण्याजोगे आहेत, असा त्यांचा आरोप आहे.
- एकाच पत्त्यावर भरमसाठ मतदार
एकाच पत्त्यावर भरमसाट मतदार या पद्धतीचा वापर करून 10,452 मतांची चोरी एकट्या महादेवपुरा मतदारसंघात केल्याचा आरोप राहुल गांधी करतात. यासाठी उदाहरण देत त्यांनी काही घरांची छायाचित्रे दाखवली आणि सांगितलं की, या छोट्याशा घरात तब्बल 80 लोक राहत असल्याची नोंद आहे. तिथे जाऊन खात्री केली तर हे लोक तिथे राहतच नाहीत, असं उघड झालं.याच आरोपासाठी आणखी एक पुरावा म्हणून ते सांगतात की, एखाद्या व्यावसायिक जागेवर भरमसाट मतदार राहत असल्याची नोंद आहे. यासाठी एका दारुभट्टीचं उदाहरण त्यांनी दिलं आणि इथे 68 लोक राहत असल्याची नोंद आहे, असं सांगितलं.
- अवैध फोटो
मतदान कार्डावरचा मतदाराचा फोटो ही मतदाराची प्रमुख ओळख असते. महादेवपुरा या मतदारसंघात 4,132 मतांची चोरी ही अवैध फोटो असलेल्या मतदान कार्डांचा वापर करून झाली आहे, असं राहुल गांधी सांगतात. यामध्ये, काही ठिकाणी इतके लहान फोटो आहेत की ते दिसतच नाहीत तर काही ठिकाणी फोटोच नाहीत, असं ते सांगतात.
- फॉर्म 6 चा गैरवापर
नव्या मतदारांना मतदान प्रक्रियेत जोडून घेण्यासाठी ‘फॉर्म 6’चा वापर केला जातो. या फॉर्म 6 चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचा आरोप राहुल गांधी करतात. त्यासाठी ते महादेवपुरा मतदारसंघातील ‘शकुनरानी’ या 70 वर्षीये वृद्ध महिलेचं उदाहरण देतात. त्यांची नोंदणी नव्या मतदार म्हणून दोनदा करण्यात आली असल्याचं ते दाखवून देतात. शिवाय, या दोन्ही शकूनरानी यांनी मतदानही केलं असल्याचा दावा ते करतात. मात्र, हे उघड होऊ नये, म्हणूनच निवडणूक आयोगाला मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट करायचे आहेत, असाही आरोप ते करतात.
- ‘मतचोरी’ करून भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली
राहुल गांधींनी वरील सर्व आरोप केल्यानंतर असा दावा केला की, ही मतचोरीची पद्धत आहे. यामध्ये एक पॅटर्न आहे. हे फक्त एका मतदारसंघात नव्हे, तर अनेक ठिकाणी घडलं आहे. निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून मतचोरीची प्रक्रिया पार पाडते आहे आणि भाजपला जिंकून देण्यासाठी मदत करते आहे, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी सांगतात, “भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 25 मतदारसंघातील निवडणूक 33 हजार मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत आणि सत्तेत राहण्यासाठीही नरेंद्र मोदींना फक्त 25 जागांची गरज होती. याच कारणास्तव निवडणूक आयोग आम्हाला डिजिटल मतदार यादी देत नाहीये,” असाही आरोप ते करतात. या मतचोरीच्या माध्यमातून लोकशाही उद्ध्वस्त केली जात आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
निवडणूक आयोगाबद्दल काय प्रश्न उपस्थित होतात?
राहुल गांधींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर काही महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगाबद्दल उपस्थित होतात.
निवडणुकीचं वेळापत्रक काही महिन्यांमध्ये का विखुरलं जातं. टप्प्याटप्प्यांमध्ये ही प्रक्रिया का पार पाडली जाते? काहीवेळा निवडणुकीचं वेळापत्रक अचानक का बदललं जातं?
मतदारांच्या संख्येत अचानकच भरमसाठ वाढ का झाली? उदाहरणार्थ, महाराष्ट्रात 5 वर्षांत जितके मतदार वाढले नाहीत, तितके विधानसभा निवडणुकीच्या आधी 5 महिन्यात कसे काय वाढले?
निवडणूक आयोग डिजिटल मतदार यादी देण्यास नकार का देतं? ज्या याद्या पुरवण्यात आल्या त्या मशीन-रिडेबल का नव्हत्या?
जर निवडणूक आयोगाकडे डिजिटल डेटा असेल, तर ते स्वतःच डुप्लिकेट मतदार आणि बनावट पत्तेही शोधू शकतात. त्यांनी आजवर हे काम का नाही केलं?
नवीन मतदारांसाठी असलेल्या फॉर्म 6 चा वापर वयाच्या सत्तरीतल्या लोकांकडून कसा केला जाऊ शकतो आणि तोही एका वर्षातून दोनदा? शिवाय, या एकाच व्यक्तीकडून दोनदा मतदान कसं काय होऊ शकतं?
अगदी लहान घर असलेल्या एकाच पत्त्यावर 80 लोकांची नावे कशी काय नोंदणीकृत आहेत?
निवडणूक आयोगाकडून 45 दिवसांनंतर सीसीटीव्ही आणि मतदान केंद्राचे व्हीडिओ का नष्ट करण्यात आले? ते साठवून ठेवण्याची सोय सध्याच्या काळात उपलब्ध असताना हा डेटा नष्ट करण्याची इतकी घाई का?
सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्याबाबतचे नियम निवडणूक आयोगाकडून का बदलण्यात आले?
महाराष्ट्रात 5 महिन्यांमध्ये वाढलेल्या 41 लाख मतदारांचं गौडबंगाल काय आहे? हे अचानक इतके मतदार कुठून आले?
इतके गंभीर आरोप असूनही निवडणूक आयोगाने औपचारिकपणे पत्रकार परिषद घेत अथवा सविस्तरपणे उत्तर देणारं एखादं निवेदन का प्रसिद्ध केलेलं नाही?
डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्हीचा डेटा नाकारून निवडणूक आयोग नागरिकांची दिशाभूल करत आहे का?














