महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे.
रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
भाजपाला बहुमताची जादूई संख्या गाठण्यासाठी पक्षाला केवळ १३ आमदारच कमी पडत आहेत. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना जोरदार हादरा दिला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे साफ पानिपत झाले असून प्रथमच राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना कामकाज करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारतीय जनता पार्टी – भाजपा-१३२
शिवसेना-५७
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)-४१
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-२०
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-१६
राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार-१०
समाजवादी पक्ष – सपा २८
जन सुराज्य शक्ती-२
राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष-१
राष्ट्रीय समाज पक्ष-१
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन-१
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम)-१
भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष-१
राजर्षी शाहू विकास आघाडी-१
अपक्ष-२