kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

आरोप-प्रत्यारोपानंतर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून का गेले?

विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे घटनास्थळी असून तणाव वाढला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पाकिटे रिकामी केली. दरम्यान, विनोद तावडे आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले. परंतु, आरोप प्रत्यारोप केल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाण्याकरता हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांना मदत केली. यावर हितेंद्र ठाकूर यांनी एएनआयशी बोलताना खुलासा केला आहे.

विवांता हॉटेलमध्ये आज मोठा राडा झाला. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केला. हॉटेलमध्ये राडा झाल्यानंतर विनोद तावडे त्यांच्या गाडीत जाऊन बसले. परंतु, थोड्याच वेळात ते गाडीतून बाहेर पडून हितेंद्र ठाकूर यांच्या गाडीत जाऊन बसले. या गाडीत हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूरही उपस्थित होते. यावेळी प्रतिक्रिया देताना हितेंद्र ठाकूर म्हणाले, “आम्ही जेवायला जातोय. मी त्यांच्याशी यासंदर्भात बोलतो.. उरलेले पैसे ते मला देतील. आम्ही मित्र आहोत.”

आता एएनआयशी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले, “पोलिसांनी मला सांगितलं की तावडेंची गाडी खराब झालीय. त्यांना सुरक्षित बाहेर काढा. ती जबाबदारीही त्यांनी माझ्यावरच टाकली. मी माणुसकी म्हणून तेही केलं. काही चुकीचं झालं तर ते चांगलं नाही. दुसरी गाडी दिली आणि त्यांना मुंबईत पाठवलं.”

हितेंद्र ठाकूर पुढे म्हणाले, पार्टी विथ डिफरंन्स म्हणणारे पैसे वाटतात. त्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सचिव येतात, याचं मला आश्चर्य वाटतं. त्यांचं हे कोणत्या प्रकारे काम सुरू आहे? महिलांनाही त्यांनी पुढे केलं. महिला तिथे तोंड लपवून बसल्या होत्या. महिलांच्या माध्यमातून पैसे वाटले तर संशय येत नाही. १९ ते २० लाख पैसे वाटले आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानेच मला हे सांगितलं होतं. बाटेंगे तो पिटेंग. मग आम्हीही मागे पुढे पाहणार नाही.”