तब्बल 19 वर्षांनी नारायण राणेंचे चिरंजीवर निलेश राणे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश राणे आग्रही आहेत. मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत यावर चर्चा झाली. निलेश राणे शिवसेनेकडून कुडाळ-मालवणचे उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेचे वैभव नाईक सध्या कुडाळमध्ये आमदार आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर वैभव नाईक यांनी ठाकरेंची साथ दिली. त्यामुळे या मतदार संघावर महायुतीत शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे. मात्र हा मतदार संघ भाजपला सुटावा असे राणे यांचे प्रयत्न आहेत. या मतदार संघातून राणेंचे पुत्र निलेश राणे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी या मतदार संघात तयारीही सुरू केली आहे.
भाजपाला ही जागा मिळणे अवघड असल्यानं तोडगा म्हणून निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाईर यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर राणे कुटुंबीयांकडून कुणीही या मतदारसंघात निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे यंदा 10 वर्षांनी पुन्हा एकदा कुडाळमधून राणे विरुद्ध नाईक या पारंपारिक प्रतिस्पर्धींमध्ये लढत होऊ शकते.
विनायक राऊत यांचा हल्लाबोल :
दरम्यान निलेश राणे यांना भाजपालनं हाकलून दिलंय, हे आता स्पष्ट झालं आहे. कुडाळमध्ये वैभव नाईक त्यांना पराभूत करतील अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राणेंचे कट्टर विरोधक विनायक राऊत यांनी केली आहे