राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचं बोललं जात होतं, मात्र आज अचानक त्रास वाढल्यामुळे त्यांना बारामतीमधून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकदा, सर्दी आणि तापेचा त्रास जाणवत होता, त्यामुळे सकाळीच डॉक्टरांच्या एका पथकाकडून शरद पवार यांची त्यांच्या बारामतीमधील निवासस्थानी तपासणी करण्यात आली होती. मात्र त्रास थोडा वाढल्यानं पुन्हा एकदा डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली, त्यानंतर त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.












