मुंबई महानगरपालिकेला अखेर साडेचार वर्षांनंतर महापौर मिळाला असून भाजपाच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर बनले आहेत. या दोघांच्या विरोधात कोणताही उमेदवार नसल्यामुळं महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते रितू तावडे आणि संजय घाडी यांनी पदभार स्वीकारताच प्रशासक राज संपुष्टात येऊन मुंबईत पुन्हा “महापौर राज” सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले. दरम्यान, सुमारे 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपाला महापौरपद मिळालं आहे. त्यामुळं ही निवड ऐतिहासिक मानली जात आहे.
महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया यावेळी नव्या नियमांनुसार पार पडली. नव्या अधिसूचनेनुसार, महापालिका आयुक्त भूषण गगराणी हेच पीठासीन अधिकारी म्हणून विराजमान झाले. यापूर्वीच्या नियमानुसार मावळते महापौर किंवा सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक निवड प्रक्रियेचे अध्यक्षस्थान भूषवत असत. मात्र, सभागृहाचा कार्यकाळ संपून जवळपास तीन वर्षे झाल्याने “मावळते महापौर” ही संकल्पना लागू होत नव्हती. जुन्या नियमानुसार शिवसेना (उबाठा) पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी होण्याचा अधिकार होता; मात्र तो अधिकार काढून थेट प्रधान सचिव दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला देण्यात आला. भूषण गगराणी यांचा दर्जा प्रधान सचिवाचा असल्याने त्यांनीच निवड प्रक्रिया पार पाडली. या नियमबदलावरून शिवसेना (उबाठा) पक्षाने आक्षेप घेतला असून सत्ताधारी-विरोधकांतील संभाव्य तिढा टाळण्यासाठीच हा बदल करण्यात आल्याची राजकीय चर्चा रंगली. विरोधी पक्षाचा पीठासीन अधिकारी असता तर सत्ताधाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या असत्या, असंही म्हटलं जात आहे.
सुमारे 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपाला महापौरपद मिळालं आहे. त्यामुळं ही निवड ऐतिहासिक मानली जात आहे. शिवसेनेच्या दीर्घकाळाच्या वर्चस्वानंतर मुंबईच्या सत्तेतील हा मोठा राजकीय बदल ठरला आहे. त्यामुळं आता आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची गरिमा राखण्याचं सर्वात मोठं आव्हान रितू तावडे आणि संजय घाडी यांच्यावर असणार आहे.












