kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्यातील महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानतंर या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी बहाल करण्यात आली. या सन्मानामुळे मुख्यमंत्री आता डॉक्टर देवेंद्र फडणवीस झाले आहेत. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोटनिवडणुकीवर भाष्य केले.

बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होत आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन जागांच्या पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली असून सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार येथून निवडणूक लढवणार हे आता निश्चित झाले आहे. सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ६ महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीने त्यांच्या उमेदवारीवर आधीच शिक्कामोर्तब केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हवाला देत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.