बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. सकाळच्या शांत वातावरणात मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी बारामती येथील गंगुबाई कांते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केलं. जानेवारीमध्ये बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादांनी (अजित पवार) अनेक वर्षांपासून खूप काम केलं आहे. हे बारामतीतील जनतेला ठाऊक आहे. आजच्या निवडणुकीत मतदान करून ते दादांच्या कामाची परतफेड करू शकतात, हे त्यांना माहित आहे. आजचा दिवस मतदानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.”
पुढे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं,” सगळे नागरिक कर्तव्य म्हणून मतदान करत आहेत. अनेक गावामधील जनता मतदानासाठी घराबाहेर पडली आहे. स्वत: बारामतीकरांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. सगळ्याच बाजूनं ही भावनिक निवडणूक आहे. शरद पवार यांचे 89 वर्षे वय आहे. त्यांचे घरीच मतदान झालं आहे. त्यांचे आशीर्वाद घेऊन आले आहे. त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली आहे. आजवर दादांशिवाय कुठल्याही गोष्टी करण्याची सवय नाही. आज ते नाहीत, हे मानून चाललं पाहिजे. गेल्या 60 वर्षांपासून बारामतीकरांनी पवार कुटुंबांना समर्थन दिलं आहे. बारामतीकरांनी अनेक विक्रम केले आहेत. बारामतीकरांनी ही निवडणूक मनावर घेतली आहे”.
मतदानापूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्या मतदानासाठी रवाना झाल्या. त्यांच्या समवेत त्यांचे दोन्ही पुत्र खासदार पार्थ पवार आणि जय पवार दोघे उपस्थित होते. या कृतीमुळे कार्यकर्त्यांमध्येही भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे.














Leave a Reply