kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

भारतीय संगीतविश्वाचा चिरतरुण स्वर हरपला !!

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. उद्या संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशा ताईंनी वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या संस्कारातून संगीताचे धडे घेतले. सुरुवातीच्या संघर्षानंतर त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा २० पेक्षा अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड करून विक्रम प्रस्थापित केला. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम”, “चुरा लिया है तुमने”, “ये मेरा दिल” यांसारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. विशेषतः आर.डी बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी भारतीय चित्रपटसंगीताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक ठरली.

आशा भोसले यांचा आवाज म्हणजे केवळ गाणे नव्हते तर प्रत्येक भावनेला जिवंत करणारी जादू होती. त्यांच्या कारकि‍र्दीसाठी पद्म विभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. वडिलांच्या निधनानंतर अगदी लहान वयातच आशा भोसले यांनी गायनाला सुरुवात केली. त्यांचे पहिले मराठी गाणे “चला चला नव बाळा” (१९४३) तर हिंदीतील सुरुवातीच्या गाण्यांमुळे त्यांना चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. आशाताईंनी केवळ फिल्मी गाणीच नाही तर गझल, भजन, कव्वाली, पॉप, मराठी भावगीते, बंगाली आणि इतर प्रादेशिक गाणी गायली आहेत. आशा ताईंच्या आवाजात रोमॅन्स, विरह, खट्याळपणा आणि गझलेची नजाकत एकाचवेळी अनुभवायला मिळत होती. त्यांचा आवाज म्हणजे भारतीय संगीतविश्वाचा एक अमर ठेवा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *