दिग्दर्शक आदित्य धरचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे. लोकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहेच आता अभिनेत्री कंगना रणौतनं देखील या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच तिने आदित्य धरच्या कामाचं देखील कौतुक केलं आहे.
कंगना म्हणाली, “धुरंधरच्या यशातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आदित्य धर आता स्वतः एक सुपरस्टार दिग्दर्शक बनला आहे. हॉलिवूडमध्ये दिग्दर्शक हे अनेकदा कलाकारांपेक्षा मोठे असतात, जसे स्टीवन स्पीलबर्ग, क्वेंटिन टॅरँटिनो , ख्रिस्तोफर नोलन”.
कंगनाने पुढे म्हटलं की, “आपण आपल्या चित्रपट निर्मात्यांना पुरेसा आदर किंवा श्रेय कधीच देत नाही. त्यांच्याकडून गरजेपेक्षा जास्त काम करून घेतले जाते, त्यांना कमी पगार मिळतो आणि सुपरस्टार्सकडून त्यांचा छळ केला जातो. याचा परिणाम म्हणून, मला असा एकही तरुण भेटत नाही, जो चित्रपट निर्माता, छायाचित्रकार किंवा इतर कोणताही तंत्रज्ञ बनण्याचे स्वप्न पाहतो”












