kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! तमिळनाडूमध्ये थलपती विजयची मोठी मुसंडी ; प्रस्थापितांना धक्का

पश्चिम बंगालमधील लढतींसह आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी इथल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तमिळनाडूमध्ये सत्ताधारी डीएमकेसह आघाडीला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळण्याचे अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त झालं होतं. मात्र अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षामुळे यंदाची लढाई तिहेरी आणि तितकीच चुरशीची झाली आहे. पदार्पणातच टीव्हीकेची कामगिरी दमदार असल्याचं पहायला मिळतंय. सुरुवातीच्या कलांनुसार विजय यांचा पक्ष 74 जागांवर आघाडीवर आहे. तर डीएमके 51 आणि एआयएडीएमके 44 जागांवर आघाडीवर आहे.

तमिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी डीएमके-काँग्रेस आघाडी सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर एआयएडीएमके-भाजप आघाडी तमिळनाडूवर नियंत्रण मिळवण्याचं लक्ष्य ठेवत आहे. या लढतीत अभिनेते आणि राजकारणी विजय आणि त्यांचा पक्ष टीव्हीकेनं सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.

तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी एकूण 234 जागांपैकी 118 जागांचा जादुई आकडा आहे. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी 164 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत आहे, तर त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस 28 जागांवर आहे. दुसरीकडे एआयएडीएमके 167 जागांवर, भाजप 27, पीएमके 18 जागांवर निवडणूक लढवत आहे. टीटीव्ही दिनकरन यांच्या एएमएमकेला 11 जागा देण्यात आल्या आहेत. तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांचा हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विजय यांनी 2024 मध्ये ‘तमिळगा वेत्री कळघम’ या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पहिल्यांदाच ते निवडणूक लढवत आहेत. विजय हे स्वत: पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. थलपती विजय हे तमिळ सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत. परंतु राजकारणात आल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं सोडून देणार असल्याचं जाहीर केलं. तमिळनाडूच्या लोकांना भ्रष्टाचार, जातीभेद, धर्मभेदमुक्त कार्यक्षम प्रशान हवं आहे आणि त्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत, असं आश्वासन विजय यांनी जनतेला दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *