kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मालेगावला माजी महापौरच निघाला गोवंश तस्कर

मालेगाव पोलिसांनी गोवंश तस्करीकडे मोर्चा वळवला असून पोलिसांनी थेट माजी महापौर एमआयएमचे नेते अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्या मालमत्तांवर छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे गोवंश जप्त करण्यात आला असून याप्रकरणात संशयित माजी महापौराविरोध गुन्हा दाखल केलाय. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे मालेगाव शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापासत्र राबवलं. यात शहरातील संवदगाव फाटा परिसरातील अब्दुल मलिक यांच्या फार्म हाऊसवर पवारवाडी पोलिसांनी छापा टाकला. तर किल्ला पोलिसांनी इस्लामाबाद भागातील अब्दुल मलिक यांच्या घराशेजारील गोदामावर छापा टाकला. पवारवाडी या ठिकाणी पोलिसांनी 3 गोवंश जनावरे अत्यंत निर्दयपणे बांधून ठेवलेली आढळली. पोलिसांनी ही सर्व जनावरे जप्त केली. तर इस्लामाबाद या ठिकाणी देखील 5 गोवंश जनावरे आढळून आली. ही सर्व जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे. येत्या 28 मे रोजी बकरी ईद सण आहे. त्यासाठी कत्तल करण्याच्या हेतूने ही सर्व जनावरं बांधून ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. जप्त केलेल्या 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे दहा गोवंश जनावरांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.

इस्लामाबाद परिसरातील घराजवळ पोलिसांची कारवाई सुरू असताना अब्दुल मलिक यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान काही गोवंश जनावरे पळवून लावण्याचा प्रयत्न करत ते घटनास्थळावरून फरार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी गोवंश संरक्षण कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे अशी माहिती तपास पोलीस कर्मचारी अशोक बच्छाव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *