मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (2 जून) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मात्र विधान परिषद निवडणुक आचारसंहिता सुरू असल्याने लगेच घोषणा होणार नाही. कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढण्यात येणार आहे. या अटी व शर्तीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.
शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. 65 लाखांहून अधिक कर्जखात्यांवरचे कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफीला मंजुरी मिळाली आहे, पण आचारसंहितेमुळे घोषणा करण्यात आलेली नाही.
दोन लाख रुपयांच्या मर्यादेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर आज शिक्कामोर्तब मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दोन लाखापर्यंत कर्ज सरकार माफ करणार असून नियमित पिक कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साननिधी देखील दिला जाणार आहे. तसेच राज्य सरकारचा ग्रामीण भागाचा विकासावर भर देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार ग्रामविकास खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत येणाऱ्या विकासकामांसाठी कर्ज घेण्यात येणार आहे. ग्रामविकास खात्यासाठी 4 हजार 229 कोटी रुपये तर सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी 1 हजार दशलक्ष डॉलर इतके कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय:
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता.
रस्त्यांच्या सुधारणेसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँके व न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला दोन्ही बँकाकडून मिळणार प्रत्येकी 8 हजार 700 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य. राज्यातील रस्ते सुधारणा व विकासाला आणखी गती मिळणार.
हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये सहा महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. यामध्ये प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, मुंबई. किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, मुंबई. श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई. ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय, मुंबई व थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई यांचा घटक महाविद्यालये म्हणून समावेश होणार.













Leave a Reply