काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये ग्रॅज्युएशन (पदवीदान) सोहळ्यादरम्यान भारतीय लष्कराचे एव्हिएशन कॅप्टन भरत भारद्वाज त्यांच्या होणाऱ्या पत्नी आरुषीला प्रपोज करताना दिसले होते. त्यांनी 2 जून रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधून फ्लाइट ट्रेनिंग (विमान प्रशिक्षण) पूर्ण केलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पासिंग आऊट परेड आणि एव्हिएशन शो झाला. याच वेळी भरत भारद्वाज यांनी होणारी पत्नी आरुषीला प्रपोज केलं. ज्यावेळी भरत यांनी आरुषीला प्रपोज केलं, त्यावेळी मागे लष्कराचे एक हेलिकॉप्टर होते. यावेळी उपस्थित कुटुंबीय आणि सहकारी अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून या खास क्षणाचं स्वागत केलं आणि आनंद साजरा केला. पण हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांची मतं विभागली गेल्याचे दिसून आले. काहींनी या कृतीचं कौतुक केलं, तर काहींनी त्यावर टीका केली.
2 जून रोजी आरुषीला प्रपोज केल्यानंतर भरत भारद्वाज यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. ते म्हणाले, “एक वर्षाच्या कठोर मेहनतीनंतर आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होता. आज आम्ही सर्वजण पायलट आणि प्रशिक्षक बनलो आहोत. आज आमच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे.”
“आरुषी माझी होणारी पत्नी आहे. आम्ही गेली पाच वर्षे एकमेकांना ओळखतो. ती माझ्याशी लग्न करेल की नाही हे विचारण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता दिवस मला योग्य वाटला नाही.”
ते पुढे म्हणाले, “आमच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा दिवस आहे. जसं माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तसा हा दिवस माझ्या होणाऱ्या पत्नीसाठीही खास बनवावा, अशी माझी इच्छा होती. या संपूर्ण कल्पनेमागे माझा हाच विचार होता.”
परंतु, कॅप्टन भारद्वाज यांची ही कल्पना सर्वांनाच आवडलेली नाही. सुरभी गरवाल नावाच्या एका यूझरने त्यांनी प्रपोज करण्यासाठी निवडलेल्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्यांनी एक्सवर लिहिलं की, “भारतीय सैन्य दलाचे अधिकारी कॅप्टन भरत भारद्वाज यांनी लष्कराच्या शिस्तीचे आणि नियमांचे (प्रोटोकॉल) उल्लंघन केले आहे. त्यांनी परेडसारख्या एका औपचारिक लष्करी कार्यक्रमादरम्यान गणवेशात आणि लष्करी उपकरणांसमोर आपल्या होणाऱ्या पत्नीला प्रपोज केलं.”
पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, “या घटनेकडे चुकीच्या नजरेने पाहण्याऐवजी सकारात्मक दृष्टीकोनातूनही पाहिलं जाऊ शकतं. देशाची सेवा करणारा गणवेशातील जवान आणि त्याची जीवनसाथी, हे एक सुंदर आणि प्रेरणादायी चित्र आहे.”
पुनीत नावाच्या यूझरने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं, “कॅप्टन भरत भारद्वाज यांनी हेलिकॉप्टरजवळ गणवेशात व्यक्त केलेलं प्रेम खूपच आकर्षक वाटतं.”
“हे कर्तव्य आणि प्रेम यांचं सुंदर मिश्रण आहे. भारतीय लष्करातील आयुष्य अभिमान आणि साहसाने भरलेलं असतं, हे यातून दिसून येतं. तसेच तरुणांसाठी गणवेश अभिमानाने परिधान करणं ही खरी प्रेरणा आहे.”














Leave a Reply