मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणात DRI ने मोठी कारवाई केली आहे. यात 5 कोटींहून अधिक किमतीचे सोने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.भाजप पदाधिकारी अजित आचरेकर नावाच्या व्यक्तीसह 5 जणांनाही अटक करण्यात आली आहे. आचरेकर भाजप कामगार संघटनेचा चिटणीस असल्याची माहिती असून काही महिन्यांपूर्वी भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता. पक्षाकडून कामगार संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणावर बोट ठेवत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे.
शिवसेनेचे कोकणातील नेते वैभव नाईक यांची वारंवार चौकशी सुरू आहे. त्या चौकशीला दिशा नाही. नाईक आंदोलन करायला लागले की त्यांना नोटीस जाते. अशा वेळी फडणवीस यांनी लक्ष घातले पाहिजे. विरोधी पक्षाच्या लोकांनाच का टारगेट केले जाते? काल (6 जून) मुंबई विमान तळावर सोने तस्करी प्रकरणात भाजपच्या लोकांना अटक झाली. यावर फडणवीस का नाही बोलत आहेत? शिवसेनेचे युनियनला आव्हान देण्यासाठी हि घुसखोरी करण्यात येत आहे. योगेश म्हणून आहेत, त्यांची ही गॅंग आहे. काय सुरू आहे हे? रवींद्र चव्हाण थेट हॉटेलमध्ये घुसतात, त्यांच्या सोबत असलेले लोक पकडले आहेत. आता मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण यांचे काय म्हणणे आहे? गोल्ड स्मगलिंगवर कण्ट्रोल रहावा म्हणून त्याना युनियन हवी आहे. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
इंडिया आघाडी संदर्भात आम्ही 7 तारखेला जाण्याबाबत चर्चा केली होती. पण उद्या (8 जून) काही कार्यक्रम आहेत. त्यामुळे आम्ही हजर राहणार नाही, आम्ही कळवले आहे. उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे हजर राहणार आहेत, अशी माहीतीही संजय राऊत यांनी दिली.
कॉकरोच जनता पार्टीबाबत मुख्यमंत्री यांनी मत व्यक्त करण्याचे कारण नाही. त्यांचा रोष का आहे, तर नीट पेपर फुटले म्हणून. विकत घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका यांच्यामुळे तो रोष आहे. खरं तर मुख्यमंत्री यांनी खेद व्यक्त केला पाहिजे. कारण पेपर फुटीप्रकरणी विद्यार्थांना आंदोलन करावे लागते आणि त्याचे केंद्र महाराष्ट्र आहे. त्यांच्या राज्यात या पेपरफुटीचाच मुख्य अड्डा आहे. सगळे लोक पकडले ते भाजपशी सबंधित आहेत. कॉकरोच जनता पार्टीला समर्थन मिळालं नाही, असे कोण म्हणाले? 11 प्रमुख शहरांमध्ये प्रमुख आंदोलन झाले आणि ते दाबण्याचा प्रयत्न झाला. हे आंदोलन काँग्रेस करत होते, हे दाबण्यासाठी जंतरमंतरवर परवानगी देण्यात आली. हे आंदोलन भारताचे सरन्यायाधीश यांचे क्रिएशन आहे. आमचे क्रिएशन नाही. असेही संजय राऊत म्हणाले.
सरन्यायाधीश तरुणांना झुरळ म्हणाले त्यातून हे लोक जमले आहेत. सरकारच्या मनात भीती आहे आणि ही सुरुवात आहे. खरं तर महाराष्ट्रात सुद्धा नीटचे आंदोलन सुरू आहे. हरियाणा, लखनऊ, हिमाचलमध्ये झाले ते सुद्धा पहा. मोबाईलवर कुठे आंदोलन म्हणता. रस्त्यावर उतरतो ते आंदोलन असते. काल असेच देशातील अनेक रस्त्यावर काँग्रेसने आंदोलन केले. त्यांच्यावर अश्रू धुरांच्या नळकंड्या फोडण्यात आल्या असेही संजय राऊत म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेसंदर्भात बिल कशाला पाहिजे? अख्खा देश त्याची मागणी करतोय. पहिले बालेट पेपरवर निवडणूक कराव्यात, ही भाजपची मूळ मागणी आहे. पक्षांतर विरोधी कायद्यातील 10 शेड्युल आहे, त्याची अमलबजावणी झाली पाहिजे. निवडणुकीत घोडेबाजार झाला नाही पाहिजे. एका चिन्हावर निवडून यायचे आणि दुसऱ्या पार्टीत जायचे, हे बंद झाले पाहिजे. अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.













Leave a Reply