kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

आज दुपारनंतर प्रचंड वेगाने वारे वाहणार, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागरिकांना इशारा

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात एख छोटेखानी निवेदन दिले. यामध्ये त्यांनी पाऊस आणि पूरपरिस्थितीच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचे सांगितले. आज दुपारनंतर अनेक भागात मोठ्याप्रमाणावर वेगाने वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे झाडे पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा. कोणीही अत्यावश्यक कारण असल्याशिवाय प्रवास करु नये. तरुणांनी या काळात पर्यटनासाठी धबधबे किंवा इतर ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मी आज राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. आज मोठ्याप्रमाणावर पावसाचा अंदाज असल्याने मी उद्या सभागृहात यावर सविस्तर निवेदन देईन. राज्य सरकारने सर्व तयारी केली होती. गेल्या दोन दिवसांत दुर्घटना होऊ शकते, अशा जागा हेरुन तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. या सगळ्यात कुठेही सरकारी यंत्रणा कमी पडणार नाही, असे आश्वासन मी देतो, असे फडणवीस यांनी सांगितले.

गेल्या दोन-तीन दिवसांत ज्या घटना घडल्या आहेत, त्याबाबत कारवाई झाली आहे. यापू्र्वी पावसाच्यादृष्टीने यंत्रणांनी तयारीही केली होती. राजकीय बोलायच असेल तर मागच्या काळात किती मृत्यू झाले याची आकडेवारी मी देऊ शकतो. पण त्याने गेलेले जीव परत येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला या सगळ्या परिस्थितीकडे संवेदनशीलपणे पाहावे लागेल. पावसाच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मानखुर्दच्या दुर्घटनेत इमारतीमधील लोक मेलले नाहीत, तर बाजूला ज्या झोपडपट्टीतील घरांवर इमारतीचा भाग कोसळला तेथील लोकांचा मृत्यू झाला. मुंबई-पुणे मार्गावर दरड कोसळली. या सगळ्या घटना निसर्गाचे चक्रं बदलल्यामुळे घडत आहेत. प्रशासनाने सगळी तयारी केली होती, पण त्याच्या विपरीत घटना घडत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

महापालिका आणि सगळ्या यंत्रणा रस्त्यावर आहेत. जशी कनेक्टिंक लिंकला दरड कोसळल्यानंतर लगेच वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई आणि पुणे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली किंवा वळवण्यात आली. राज्य सरकार आणि यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. तरीही कालपासून प्रवासात असलेले काही लोक अडकलेले आहेत. या लोकांना परत फिरुन दुसऱ्या मार्गाने कसे जाता येईल, याची व्यवस्था आपण करत आहोत. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, पाणी साचले आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम स्थळांच्या सुरक्षेच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना

सध्याचे हवामान आणि ताशी ७० ते ८० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विकासक, वास्तुविशारद, परवानाधारक सर्वेक्षक (LS), कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापक आणि बांधकाम स्थळांशी संबंधित अभियंते यांना खालील सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

१) बांधकामासाठी उभारलेले तात्पुरते मचान / परांची (स्कॅफोल्डिंग), सुटे व खुले साहित्य, क्रेनवरील साहित्य, संरक्षण भिंतींसह (कंपाऊंड वॉल्स) बांधकाम स्थळी असणारे पत्रे, साचाबांधणी (फॉर्मवर्क) तसेच सर्व तात्पुरत्या संरचनांची सखोल तपासणी करून त्या स्थिर, सुरक्षित आणि भक्कम स्थितीत असल्याची खात्री करावी.

इमारतीच्या वरच्या मजल्यांवर, गच्चीवर (टेरेस) आणि उंचावरील प्लॅटफॉर्मवर असलेले सुटे व खुले साहित्य त्वरित हटवावे किंवा योग्यप्रकारे बांधून सुरक्षित करावे.

२) कोणत्याही बांधकाम स्थळी अव्यवस्थित किंवा निष्काळजीपणे कामकाज होऊ देऊ नये. सर्व कामाचे नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणी सुरक्षितरित्या व पद्धतशीरपणे करावी.

खोदकाम करण्यात आलेल्या बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि त्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी.

३) टॉवर क्रेन, मटेरियल होईस्ट, बांधकाम लिफ्ट, सुरक्षा जाळ्या (सेफ्टी नेट्स) आणि उचलण्याची उपकरणे (लिफ्टिंग इक्विपमेंट) यांची स्थिरतेच्या दृष्टीने तपासणी करावी.

हवामानामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास उचलण्याची कामे (लिफ्टिंग ऑपरेशन्स) आणि उंचावरची सर्व कामे तात्काळ थांबवावीत. तसेच, बांधकाम सुरू असलेल्या परिसरात प्रतिबंधित सुरक्षा क्षेत्र (Exclusion Zone) कायम ठेवावे.

४) सर्व कामगारांनी निर्धारित वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) तसेच उंचावर काम करताना आवश्यक ‘फॉल प्रोटेक्शन’चा वापर करणे बंधनकारक आहे.

संपूर्ण बांधकाम स्थळाची तात्काळ सुरक्षा तपासणी करून सर्व असुरक्षित बाबी विलंब न करता दुरुस्त कराव्यात.

५) हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

सर्व संबंधितांनी या सुरक्षाविषयक सूचनांकडे अत्यंत तातडीची बाब म्हणून पाहावे. सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

कामगार, परिसरातील रहिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. सर्व विकासकांनी या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन लागू असलेल्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे आणि उत्कृष्ट बांधकाम पद्धतींचे काटेकोरपणे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *