माहीममधून अमित ठाकरे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. आजवर कधीही निवडणूक न लढवलेल्या राज ठाकरेंसाठीही ही लढत म्हणजे सत्वपरीक्षा आहे. कारण अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर ती जागा निवडून आणण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. माहीममधून आपण निवडून येऊ कारण तिथल्या जनतेला बदल हवा आहे असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी अजिबात एकत्र येऊ नये असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत.
माहीममध्ये लोकांना बदल हवा आहे. मी अतिआत्मविश्वास म्हणून सांगत नाही पण मला ठाऊक आहे माहीमची जनता मला निवडून देईल. मी हरलो तर काय? याचा विचार मी केलेला नाही. मी जिंकणार आहे या खात्रीने अतिआत्मविश्वासाने नाही तर खात्रीने मी हे सांगतो आहे. असं अमित ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याशी संवाद साधता का? राजकीय चर्चा करता का? असं विचारल्यावर अमित ठाकरे म्हणाले, “तेजस माझ्यापेक्षा खूप लहान आहे, त्यामुळे त्याच्याशी ही चर्चा करण्यात काही अर्थ नाही, तशी काही चर्चा होत नाही. आदित्यही माझ्यापेक्षा लहान आहे. पण तो राजकारणात आहे. २०१७ मध्ये त्यांच्या पक्षाने जे काही केलं त्यानंतर माझा आणि आदित्यचा काहीही संवाद नाही. मी आजारी होतो तेव्हा आमच्या पक्षाचे सहा नगरसेवक शिवसेनेने फोडले. आता ते खोके खोके करतात. तुम्ही तेव्हा किती खोके दिलेत? माझी काय परिस्थिती होती आणि माझ्या वडिलांची (राज ठाकरे) काय परिस्थिती होती? हे कुणीच बघत नाही आणि कुणीही त्याबद्दल बोलत नाही. आता गद्दार, खोके असं म्हणत फिरत आहेत. मात्र तो माझ्या आजारपणाचा काळ होता. राज ठाकरे तेव्हा उद्धव ठाकरेंच्या एका कार्यक्रमाला गेले होते. त्यानंतर आठवड्याभरातच सहा नगरसेवक फोडले गेले. मला तो सगळा प्रकार माहीत आहे.” असंही अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.
दोन भाऊ एकत्र यावेत असं जे काही बोललं जातं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ते मला मुळीच वाटत नाही. माझ्या डोक्यातून ते निघून गेलं आहे. २०१७ मध्ये असं वाटत होतं. २०१४ मध्येही वाटलं होतं. २०१९ मध्येही ठाकरे बंधू एकत्र यावेत असे काही प्रय़त्न झाले. पण आता माझ्या डोक्यातून तो विषय संपला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अजिबात एकत्र येऊ नये. कारण पक्षनिष्ठा हा विषय महत्त्वाचा असतो. मी आजारी असताना आमचे सहा नगरसेवक फोडण्यात आले. सातव्या नगरसेवकालाही ऑफर होती. त्यांनी आम्हाला फोन करुन सांगितलं. आज ४० आमदार फुटल्यानंतर जे खोके खोके करत आहेत त्यांना त्यावेळी स्वतः केलेली चूक दिसत नाही का? माझ्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा विषय संपला आहे असं अमित ठाकरेंनी सांगितलं. अमित ठाकरे यांनी साम टीव्हीला एक सविस्तर मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आहे.