खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाने तर खोत यांनी माफी मागावी अशी मागणी केली. दरम्यान, खोत यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. सदाभाऊ खोत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
सदाभाऊ खोत माफी मागताना काय म्हणाले?
“कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे खोत म्हणाले.
“मी वापरलेली भाषा ही गावगाड्याची भाषा आहे. कारण एखादी व्यक्ती आभाळाकडे बघून बोलत असेल तर आम्ही त्याला आरशात बघ असं म्हणतो.
गावगाड्याची भाषा समजायला मातीमध्ये रुजावं लागतं. मातीमध्ये राबावं लागतं. मातीमध्येच मरावं लागतं. त्यानंतरच गावाकडची आणि मातीची भाषा समजते,” असेही खोत यांनी सांगितले.